Coronavirus in Parabhani : संचारबंदी नियम मोडून मध्यरात्री कापड विक्री; दुकानदाराला दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 14:32 IST2021-05-05T14:31:57+5:302021-05-05T14:32:41+5:30
Coronavirus in Parabhani : काही व्यापारी मात्र बंद दाराआड व्यवसाय करीत असल्याचा प्रकार मागच्या दोन-तीन दिवसांपासून घडत आहे.

Coronavirus in Parabhani : संचारबंदी नियम मोडून मध्यरात्री कापड विक्री; दुकानदाराला दहा हजारांचा दंड
परभणी : संचारबंदीचे नियम मोडून मध्यरात्री दुकानाचे शटर बंद ठेवून कापड विक्री करणाऱ्या येथील एका व्यावसायिकाला १० हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. असे असताना काही व्यापारी मात्र बंद दाराआड व्यवसाय करीत असल्याचा प्रकार मागच्या दोन-तीन दिवसांपासून घडत आहे. ४ मे रोजी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास शिवाजी चौक ते नानलपेठ या रस्त्यावरील एका कापड दुकानात शटर बंद करून कापड विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. तेव्हा शंभरपेक्षा अधिक ग्राहक दुकानांमध्ये आढळले. ‘इम्प्रेशन’ नावाने सुरू असलेल्या या दुकान व्यावसायिकाकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वसमत रस्त्यावर कारवाई
शहरातील वसमतरोड भागातील ‘रंगवर्षा’ नावाचे दुकान ५ मे रोजी सकाळच्या सुमारास सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी या दुकानावर जाऊन कारवाई केली आहे. दुकानदाराकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच याच भागात शगुन नावाचा दुकानात शटर बंद करून व्यवसाय सुरू होता. या व्यावसायिक विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश डॉ.कुंडेटकर यांनी पोलिसांना दिले आहेत.