CoronaVirus : अजूनही गांभीर्य नाही ! दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 18:57 IST2020-04-01T18:55:43+5:302020-04-01T18:57:17+5:30
संचारबंदी असतानाही दुकाने ठेवले उघडे

CoronaVirus : अजूनही गांभीर्य नाही ! दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
परभणी : जिल्ह्यात संचारबंदीमुळे सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश असतानाही दुकाने उघडून संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा शहरातील गवळी गल्ली येथील साहेबराव नामदेव जंगले यांनी संचारबंदी असतानाही ३१ मार्च रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास कपडे शिवून देण्याचे दुकान उघडे ठेवले व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केले. याबद्दल त्यांच्यावर पोलीस कर्मचारी गिरीश चन्नावार यांच्या फियार्दीवरून पूर्णा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या घटनेत पूर्णा तालुक्यातील पिंपरण येथील शिवहार गंगाधर सोनटक्के यांनी ३१ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पानपट्टी उघडी ठेवली व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केले. याबाबत पोलीस कर्मचारी सूर्यकांत केजगीर यांच्या फियार्दीवरून त्यांच्याविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना गंगाखेड शहरातील आहे. शहरातील पानटपरी चालक अब्दुल जलील अब्दुल खालिक याने ३१ मार्च रोजी सकाळी सव्वा दहा वाजता पानपट्टी बंद ठेवण्याचा आदेश असतानाही ती सुरू ठेवली. याबाबत पोलिस कर्मचारी संतोष सानप यांच्या फियार्दीवरून आरोपीविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथी घटना परभणी शहरातील आहे शहरातील शाही मस्जिद परिसरात सकाळी १० वाजता आरोपी मुक्तार खान रशीद खान याने संचारबंदी असताना चहाचे हॉटेल उघडे ठेवले व शासनाच्या कायद्याचा भंग केला. याबाबत पोलीस कर्मचारी सुनील राठोड यांच्या फियार्दीवरून आरोपीविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.