कोरोनाने अडविली माहेराची वाट, विवाहितांना लागली ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST2021-07-19T04:13:18+5:302021-07-19T04:13:18+5:30
नवविवाहितांना आखाड महिन्यात त्यांच्या माहेरी पाठविले जाते. या निमित्ताने माहेरच्या लोकांची ओढ नवविवाहितांना लागते. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गाचा ...

कोरोनाने अडविली माहेराची वाट, विवाहितांना लागली ओढ
नवविवाहितांना आखाड महिन्यात त्यांच्या माहेरी पाठविले जाते. या निमित्ताने माहेरच्या लोकांची ओढ नवविवाहितांना लागते. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गाचा परिणाम या रितिरिवाजांवरही झाला आहे. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावलेला होता. मात्र त्यानंतर हळूहळू हा संसर्ग कमी झाला आणि थांबलेले विवाह सोहळे अनेकांनी आटोपून घेतले. आता आखाड महिना सुरू झाला आहे. परंतु, अजूनही कोरोनाची धास्ती कायम असल्याने खुलेआम प्रवास केला जात नाही. त्यामुळे नवविवाहितांना माहेरी पाठविण्याचे टाळले जात आहे. आखाड महिन्यात माहेरी जाण्याची ही संधी अनेक नवविवाहितांना गमवावी लागली. त्यामुळे माहेरच्या वाटेवर कोरोनाचे अडथळे अजूनही कायम असल्याचे दिसत असून, नवविवाहितांना आपल्या इच्छांना मुरड घालावी लागत आहे.
नवविवाहित मुलींच्या आई म्हणतात...
दोन आठवड्यांपूर्वीच मुलीचा विवाह सोहळा पार पडला. इतर तालुक्यात सासर असल्याने मुलीला माहेरी येण्यासाठी अडचणी आहेत. बसेस सुरू असल्या तरी गर्दीमध्ये प्रवास करणे टाळले. त्यामुळे आखाडात मुलीला माहेरी आणले नाही.
- संगीता भांडवले
नुकताच विवाह झाला असून, माहेरी जाण्याची ओढ लागली आहे. परंतु, कोरोना आणखीही पूर्णपणे थांबला नाही. त्यामुळे गर्दीत न जाण्याची काळजी स्वत:हून घेते. इच्छा असूनही माहेरी जाता आले नाही.
- मोहिनी यादव
विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलीला आषाढ महिन्यात माहेरी आणण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे माझ्या लेकीनेही आषाढ महिन्यात माहेरी यावे, अशी माझी इच्छा आहे; पण कोरोनाने सर्व विस्कळीत केले आहे.
-गोदावरी सातपुते देवगावफाटा, ता. सेलू.
पहिल्या आषाढीला माहेरी जाण्याची खूप इच्छा होती. कोरोनामुळे बाहेरगावी जाणे टाळल्याने शक्य होत नाही. माहेरचे चित्र डोळ्यासमोर दिसते. दुसरीकडे सासर हेच माझे माहेर झाले आहे.
-पल्लवी साळेगावकर
लग्न सोहळे उरकले
कोरोना संसर्गामुळे मे महिन्यापर्यंत लांबणीवर टाकलेले लग्न सोहळे जून महिन्यात उरकून घेण्यात आले आहेत. पन्नास वऱ्हाडी मंडळींच्या आदेशाचे पालन करीत ठिकठिकाणी हे विवाह पार पडले.