Corona virus : अहो आश्चर्य ! कोरोना सर्वेक्षणात गैरहजर राहिल्याप्रकरणी मृत प्राध्यापकास कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 17:38 IST2021-05-19T17:37:32+5:302021-05-19T17:38:39+5:30
कोरोना काळात तहसील प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Corona virus : अहो आश्चर्य ! कोरोना सर्वेक्षणात गैरहजर राहिल्याप्रकरणी मृत प्राध्यापकास कारणे दाखवा नोटीस
गंगाखेड- कोरोना सर्वक्षणात रूजू न झाल्याने एक वर्षापूर्वी मृत प्राध्यापकासह निवृत्तांना तहसील प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिल्याचे समोर आले आहे. दि.१२ मे या काढण्यात आलेल्या या नोटीस बुधवारी ( दि.१९ ) प्राप्त झाल्या आहेत.मृत आणि निवृत्तांना नोटीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून कोरोना उपयायोजानेबाबत तहसिल कार्यालयास गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याची चर्चा आहे.
नगरपालिकेच्या कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी दि.७ मे रोजी शिक्षक, प्राध्यापक यांना तहसीलदारांनी आदेश दिले होते. यात संत जनाबाई महाविद्यालयातील मृत प्राध्यापक हाश्मी सय्यद रफीक सय्यद तमीज याचे सुद्धा नाव होते. यावर कळस करत या मृत प्राध्यापकालाच सर्वेक्षणात रूजू का झाले नाही म्हणून दि.१२ मे रोजी कारणे दाखवा नोटीस काढली आहे. या नोटीस बुधवारी गैरहजर असलेल्यांना प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीलाच मृत आणि निवृत झालेल्या शिक्षक, प्राध्यापक यांना कोरोना सर्वेक्षणाच्या कामाचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याने हा विषय चांगलाच चर्चिला जात आहे. यामध्ये संत जनाबाई महाविद्यालयातील निवृत प्राध्यापक मधुकर घुगे, कल्पना खळीकर, सरस्वती विद्यालयातील निवृत शिक्षक राम पाठक, शाम बाजपेयी यांचा समावेश आहे. यामुळे तहसिल कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त यादीची खात्री केली नसल्याने असे घडले असावे. अशा कामात गटशिक्षण अधिकारी, तहसीलदार यांनी यादी मिळाल्यानंतर मृत, निवृत, काॅरंन्टाईन अशी नोंद करणे आवश्यक आहे. आदेश काढण्यापूर्वी यादीची तपासणी, खात्री करावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
- सुधीर पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी