परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १७१ कोरोना बळी; रुग्णसंख्या ४ हजार २९३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 18:59 IST2020-09-15T18:50:05+5:302020-09-15T18:59:06+5:30
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे़ शहरी भाग, ग्रामीण भागातील गावे आणि शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे़

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १७१ कोरोना बळी; रुग्णसंख्या ४ हजार २९३ वर
परभणी : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरू झाला असून, सोमवारी दिवसभरात विक्रमी १८६ रुग्णांची नोंद झाली आहे़ तर दुसरीकडे ५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत असताना दगावल्याने परभणीत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ४ हजार २९३ वर पोहचली आहे़ आतापर्यंत १७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे़ शहरी भाग, ग्रामीण भागातील गावे आणि शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ दररोज रुग्णांची संख्या वाढत असून, त्या जोडीला मागील एक महिन्यापासून सुरू झालेली मृत्यूची मालिका अद्यापपर्यंत खंडित झाली नाही़ त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे़ सोमवारी दिवसभरात १८६ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे़ त्यामध्ये परभणी तालुक्यात ८२, सोनपेठ तालुक्यात २१, गंगाखेड १९, पालम १०, जिंतूर १०, सेलू ७, पाथरी ६, मानवत ४ आणि पूर्णा तालुक्यामध्ये एक रुग्ण आढळला आहे़ परभणी शहरातील आंबेडकरनगर, भाग्यनगर, एकनाथनगर, समाधान कॉलनी, पार्वती नगर, शांतीनगर, कल्याण नगर, बाभळी, देशमुख हॉटेल, दत्तनगर, पोखर्णी, रंगनाथ नगर, पोलीस क्वार्टर, पिंगळी, गव्हाणे रोड, आनंद नगर, कल्याण नगर, रामकृष्ण नगर, खाजगी हॉस्पीटल, सत्कार कॉलनी, दासगणू नगर, सुयोग कॉलनी, कडबी मंडई, दर्गा रोड, जिल्हा रुग्णालय, विद्यानगर, विवेक नगर, बँक कॉलनी, गुजरी बाजार, वसमत रोड, कृषी नगर, जिंतूर रोड, वकील कॉलनी, वैभव नगर, शिवराम नगर, सरगम कॉलनी, नाथनगर आदी वसाहतींमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत़ सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील ५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे़ त्यामध्ये शासकीय रुग्णालयातील ४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे़ मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ३ रुग्ण परभणी जिल्ह्यातील तर दोन रुग्ण हिंगोली जिल्ह्यातील आहेत़
६७ रुग्णांची कोरोनावर मात
सोमवारी दिवसभरात ६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ या रुग्णांना कोरोनाच्या अनुषंगाने कोणतीही लक्षणे आढळली नाहीत़ त्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़
एकूण रुग्णसंख्या ४ हजार २९३
परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ४ हजार २९३ वर पोहचली आहे़ आतापर्यंत १७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ३ हजार २०९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत़ ९१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़