जिल्ह्यात कोरोनाने २० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:28 IST2021-05-05T04:28:33+5:302021-05-05T04:28:33+5:30

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. ४ मे रोजी २० रुग्णांचा मृत्यू ...

Corona kills 20 in district | जिल्ह्यात कोरोनाने २० जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाने २० जणांचा मृत्यू

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. ४ मे रोजी २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची धास्ती पुन्हा वाढली आहे.

जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. मागच्या दोन-तीन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली आहे; परंतु कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र अजूनही घटलेले नाही. मंगळवारी जिल्ह्यात २० जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांच्या चिंता आणखीच वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, येथील आयटीआय रुग्णालयात एकाच दिवशी १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १५ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन दिवसांपासून घटल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिवसभरात २ हजार ७६२ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार ९९२ अहवालांमध्ये ६१४ आणि रॅपिड टेस्टच्या ७७० अहवालांमध्ये २३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४० हजार १७ झाली असून, त्यापैकी ३१ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ९४८ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ७ हजार ८९३ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात २१८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५८, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २४७, अक्षदा मंगल कार्यालय १६८, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ६ हजार ३३० एवढी आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

मागच्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज नोंद होणाऱ्या नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मंगळवारी नवीन ८४४ रुग्ण नोंद झाले. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९४३ एवढी आहे. या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

Web Title: Corona kills 20 in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.