कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला ३ हजार लग्नांचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST2021-04-21T04:17:39+5:302021-04-21T04:17:39+5:30
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे गतवर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले. ...

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला ३ हजार लग्नांचा बार
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे गतवर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले. अनलॉक प्रक्रियेनंतर काही अटींच्या अधिन राहून लग्न सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली असली तरी कोरोनाची नागरिकांच्या मनात धास्ती कायम होती. त्यामुळे नियोजित विवाह सोहळ्यांवर परिणाम झाला असेल, असे सर्वसामान्यांना वाटत होते; परंतु प्रत्यक्षात हा समज खोटा ठरला आहे. जिल्ह्यात कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या वर्षभरात जवळपास ३ हजार लग्न विवाह सोहळे पार पडले आहे. लग्न केल्यानंतर शासन नियमानुसार त्याची संबंधित शासकीय कार्यालयात नोंद करणे आवश्यक आहे. त्यानुसार परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करण्यात आलेल्या नोंदणीनुसार २०२० या वर्षी परभणी तालुक्यात ५२ दाम्पत्यांनी विवाहाची नोंदणी केली. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनाचे संकट अधिक गडद असतानाही गेल्या दोन महिन्यात ११ दाम्पत्यांनी परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे विवाहाची नोंद केली आहे. अनेकांनी मात्र नोंदणी केलेली नाही.
वर्षभरात २७ लग्नतिथी
गत वर्षी १० मार्चपासून विवाह मुहूर्त सुरू झाले होते; परंतु कोरोनामुळे राज्यात १८ मार्चपासून प्रतिबंध लागू करण्यात आले. २२ मार्चपासून तर देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. या वर्षात मार्चनंतर अनेक विवाह मुहूर्त होते. त्यात १६, १७, २५, २६ एप्रिल, १, २, ४, ५, ६, १५, १७, १८, २३ मे, ११, १५, १७, २७, २९, ३० जून, २७, २९, ३० नोव्हेंबर, १,७,९, १०, ११ डिसेंबर या कालावधीत विवाह मुहूर्त होते; परंतु कोरोनामुळे या विवाह सोहळ्यावर परिणाम झाला.
६३ जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल
परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे तालुक्यातील ५२ विवाह सोहळ्याची २०२० या वर्षात नोंद झाली आहे. ही आकडेवारी परभणीपुरतीच मर्यादित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात गेल्या वर्षभरात जवळपास ३ हजार विवाह सोहळे झाले आहेत. त्याच्या नोंदी मात्र स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगर पालिका कार्यालयात नाहीत.
एप्रिल कठीण
चालू वर्षात आतापर्यंत ११ विवाह सोहळ्याची परभणीतील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंद झाली आहे. चालू एप्रिल महिन्यात २२, २४, २६, २७, २८, २९, ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत; परंतु ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने प्रशासनाच्या नियमामुळे विवाह होणे कठीण आहे.
दोन वर्षात सर्व लग्न रद्द झाल्याने नुकसान झाले आहे. मंगल कार्यालयात दुरुस्ती, नवीन कामे मागील वर्षी केली, त्याचा खर्च अद्याप निघाला नाही. वरून विजेचे बिल घरातून भरण्याची वेळ आली आहे.
- प्रमोद वाकोडकर, अध्यक्ष, जिल्हा मंगल कार्यालय संघटना.