वर्षभरानंतरही कोरोनाचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:56+5:302021-04-17T04:16:56+5:30

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १६ एप्रिल २०२० रोजी परभणीतील एमआयडीसी भागात आढळला होता. त्यानंतरही गेल्या वर्षभरात कोरोनाचे ...

The Corona crisis persisted throughout the year | वर्षभरानंतरही कोरोनाचे संकट कायम

वर्षभरानंतरही कोरोनाचे संकट कायम

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १६ एप्रिल २०२० रोजी परभणीतील एमआयडीसी भागात आढळला होता. त्यानंतरही गेल्या वर्षभरात कोरोनाचे संकट जिल्ह्यावर कायम असले तरी या संदर्भात पूर्वी कोरोनाबाबत वाटणारी काळजी आता मात्र नागरिकांमध्ये तेवढ्या तीव्रतेने दिसत नाही. परिणामी संचारबंदी असतानाही बिनदिक्कतपणे रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात कमी झालेली नाही.

गतवर्षी देशात पहिला कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये ३०डिसेंबर रोजी सापडला होता. त्यानंतर हळूहळू देशातील रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यानंतर २२ मार्च २०२० पासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. १६ एप्रिल २०२० रोजी पुणे येथून हिंगोलीकडे जाणारा तरुण परभणी शहरातील एमआयडीसी भागात नातेवाइकांकडे आला व त्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. हा जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरला. त्यानंतर जूनपर्यंत कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. नंतरच्या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. दिवाळीपूर्वी ही संख्या घटली. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत झाले. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून नागरिकांची सुटका झाली, असे वाटत असतानाच फेब्रुवारीच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या वाढत गेली. मार्च महिन्यात तब्बल ६ हजार २८१ रुग्णांची वाढ झाली; तर ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर १ ते १६ एप्रिल या १६ दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल ९ हजार ७८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती यानिमित्ताने समोर आली आहे. यावर मात करण्याच्या अनुषंगाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. असे असताना नागरिक मात्र याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाहीत. परिणामी संचारबंदीचे उल्लंघन करून सर्रासपणे रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ११.५ टक्के

आरोग्य विभागाने गेल्या वर्षभरात १५ एप्रिलपर्यंत २ लाख ४ हजार ८३३ नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी केली. त्यामध्ये १ लाख १६ हजार ६८७ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात १२ हजार ८८३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे १०.१७ टक्के प्रमाण आहे; तर ७८ हजार १४६ जणांची ॲंटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात १० हजार ६२२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याचप्रमाणे १३.५९ टक्के आहे. जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत केलेल्या २ लाख ४ हजार ८३३ तपासण्यांमध्ये २३ हजार ५०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. याचे प्रमाण ११.४८ टक्के आहे.

मृत्युदर २.५१ टक्के

जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत ५९१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये परभणी शहरातील २८७, तर ग्रामीण भागातील ३०४ जणांचा समावेश आहे. आढळून आलेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचा दर २.५१ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.३६ टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्युदर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.

Web Title: The Corona crisis persisted throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.