येलदरी धरणाचा ठेका पुन्हा राजीव गांधी संस्थेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:43+5:302021-02-05T06:06:43+5:30

येलदरी : जिल्ह्यातील सर्वांत मोठा जलाशय असलेल्या येलदरी धरणातील मत्स्य व्यवसायाचा ठेका पुन्हा स्व. राजीव गांधी मत्स्य व्यवसाय सहकारी ...

The contract for Yeldari Dam was again awarded to Rajiv Gandhi Sanstha | येलदरी धरणाचा ठेका पुन्हा राजीव गांधी संस्थेला

येलदरी धरणाचा ठेका पुन्हा राजीव गांधी संस्थेला

येलदरी : जिल्ह्यातील सर्वांत मोठा जलाशय असलेल्या येलदरी धरणातील मत्स्य व्यवसायाचा ठेका पुन्हा स्व. राजीव गांधी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला पूर्ववत करण्याचा निर्णय मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ.अतुल पाटणे यांनी दिला आहे.

परभणी जिल्ह्यातील येलदरी हा तलाव मत्स्य व्यवसायासाठी सर्वांत मोठा तलाव असून, त्याचे क्षेत्र ६२७२ हेक्‍टर एवढे प्रचंड आहे. या जलाशयात पाच वर्षे कालावधीसाठी मासेमारी करण्याचा ठेका प्रतिवर्ष ३ लाख दहा हजार याप्रमाणे स्व. राजीव गांधी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित येलदरी कॅम्प यांना मिळाला होता. मात्र जलाशयामधील आर्थिक गुंतवणुकीबाबत पीपीपी आणि करारास मान्यता मिळण्यापूर्वीच येलदरी जलाशयात गुंतवणूक झाल्याचा निष्कर्ष काढत या जलाशयाचा ठेका मुदतपूर्व रद्द करून संस्थेस काळ्या यादीत टाकले होते. तलाव ठेका रद्द करण्याच्या आदेशाविरुद्ध ठेकेदाराने दाखल केलेल्या अपिलावर १४ डिसेंबर २०२० रोजी सुनावणी होऊन आयुक्तांचा तलाव ठेका रद्द करण्याचा आदेश कायम करण्याचा निर्णय घेतला होता. या आदेशाविरुद्ध मत्स्य व्यवसाय खात्याच्या मंत्र्यांकडे पुनरनिरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सुनावणी होऊन आयुक्तांचे तलाव रद्द करण्याचे आदेश रद्द करण्याचा आदेश पारित झाला आहे. त्यानुसार स्व. राजीव गांधी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचा येलदरी जलाशयातील तलाव ठेका पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच या संस्थेला काळ्या यादीतूनही वगळण्यात आले आहे. येलदरी येथील तलाव ठेका तांत्रिक बाबींमुळे रद्द झाला होता. मात्र इतर संस्थांनी जिल्ह्यातील काही नागरिकांना हाताशी धरून संबंधित संस्थेच्या विरोधात मोठे आंदोलन उभारले होते. यामध्ये राजीव गांधी संस्थेवर अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र आता मत्स्य विभागाकडून या सर्व आरोपांना खारीज करण्यात आल्याने राजीव गांधी मत्स्य व्यवसाय संस्थेचे मनोबल वाढले आहे, असे राजीव गांधी संस्थेचे अध्यक्ष सय्यद माबुद सय्यद मेहबूब यांनी सांगितले.

Web Title: The contract for Yeldari Dam was again awarded to Rajiv Gandhi Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.