वाळूअभावी १५० घरकुलांचे बांधकाम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST2021-02-10T04:17:31+5:302021-02-10T04:17:31+5:30
नगरपालिकेच्या माध्यमातून अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना शहरात प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरातील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, बुद्धनगर या प्रमुख भागासह ...

वाळूअभावी १५० घरकुलांचे बांधकाम ठप्प
नगरपालिकेच्या माध्यमातून अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना शहरात प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरातील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, बुद्धनगर या प्रमुख भागासह इतर भागांत राहत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळपास १५० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहेत. घरकुलाचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाल्याने लाभार्थांनी घरकुल बांधकामाला सुरुवात केली. मात्र वाळू मिळत नसल्याने या लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम रखडले आहे. वाळू माफिया वाळूची चोरी करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. यामध्ये तीन ब्रास क्षमता असलेले वाहन २२ हजार रुपयाला जात आहे. पाच ब्रास वाळू क्षमता असलेले हायवा हे वाहन ४५ हजार रुपयाला विक्री केले जात आहे. अव्वाच्या सव्वा दराने वाळू विक्री करून वाळूमाफिया मलिदा लाटत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. वाळूचे हे दर सामान्य घरकुल लाभार्थ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते खरेदी करू शकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मागील दोन महिन्यापासून या घरकुलाचे बांधकाम बंद पडले आहे. काही लाभार्थ्यांना दुसरीकडे राहण्याचा ठिकाण नसल्याने उघड्यावरच दिवस काढावे लागत आहेत. दुसरीकडे शासनाने घरकुल लाभार्थ्यासाठी पाच ब्रास वाळूची सोय केली आहे. याबाबतीत शासनाने रीतसर परिपत्रक काढले असतानाही ही मोफत वाळू मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. राज्य सरकारने याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत. मात्र प्रशासनाकडून लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.
वाळू घाट आरक्षित करण्याची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयाने वाळू घाटांची नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली असून, तालुक्यातील वांगी येथील वाळू घाट यावेळी पाथरी येथील ठेकेदाराला सुटला आहे. आठवडाभरात येथील वाळू विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून घाटाचे लिलाव झाले नसल्याने यामुळे या वेळेस वाळूची मागणी मोठ्या प्रमाणावर असणार आहे. वाळूच्या दराबाबत ही बांधकाम करणाऱ्या नागरिकांना चिंता लागली आहे. घरकुल लाभार्थ्यांना मिळणारा निधी आणि वाळूचे दर पाहता लाभार्थ्यांना हे परवडणार नसल्याने जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून रमाई घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास वाळू उपलब्ध व्हावी यासाठी तालुक्यातील गोदावरी नदीवरील एखादा वाळू घाट आरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.