केवळ बाराशे लीटर दूध संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST2021-04-07T04:17:51+5:302021-04-07T04:17:51+5:30
गंगाखेड शहरात असलेल्या शासकीय दूध संकलन केंद्रावर तालुक्याच्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक संस्थेचे दूध संकलित केले जात आहे. शासकीय ...

केवळ बाराशे लीटर दूध संकलन
गंगाखेड शहरात असलेल्या शासकीय दूध संकलन केंद्रावर तालुक्याच्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक संस्थेचे दूध संकलित केले जात आहे. शासकीय दूध संकलन केंद्रात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी संस्थेच्या दुधाला योग्य फॅट लावत नाहीत. फॅट लावण्यासाठी वापरले जाणारे अल्कोहोल निकृष्ट दर्जाचे असून, त्यामध्ये पाणी मिसळण्याचे प्रकारही समोर आले आहेत. याबाबत दूध उत्पादकांनी अनेक वेळा या दूध संकलन केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे दूध उत्पादकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे याचा फटका शासकीय दूध संकलन केंद्रातील दूध संकलनावर झाला आहे. आजपर्यंत दरदिवशी २० ते २५ दूध उत्पादक संस्थांचे ५ हजार लीटरपेक्षा अधिक दूध संकलन केले जात होते. मात्र, मागील काही दिवसांपासून या शासकीय दूध संकलनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरेरावीमुळे दूध संस्थांनी आपले दूध या केंद्रात घालण्यासाठी पाठ फिरवली आहे. मागील काही दिवसापासून केवळ १० संस्थांचे दूध या केंद्रात येत असून, केवळ १२०० लीटर दुधाचे संकलन केले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.