११९० सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:48+5:302021-02-05T06:03:48+5:30
गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या वतीने १७ जून २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ...

११९० सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या वतीने १७ जून २०२० पर्यंत मुदत संपलेल्या विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय १८ मार्च २०२० रोजी घेण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. जिल्ह्यात ३१ डिसेंबरअखेरपर्यंत १ हजार १९० विविध सहकारी बँका, नागरी बँका, विविध कार्यकारी सोसायट्या, औद्योगिक, बेरोजगार, गृहनिर्माण सोसायट्या आदींची मुदत संपली होती. त्यामुळे या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय आता राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. या अनुषंगाने २ फेब्रुवारी रोजी आदेश काढण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यात विधान परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे राज्यातील लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या टप्प्यापासून शासनाच्या कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करून घेण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार १९० सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता जिल्हा सहकार विभागाला राज्य निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. हा आदेश आल्यानंतर तातडीने निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.
पहिल्या टप्प्यात चार संस्थांच्या निवडणुका
जिल्ह्यातील ११९० सहकारी संस्था निवडणुकीसाठी पात्र असल्या तरी पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महेश अर्बन बँक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था आणि महावितरण कर्मचारी सहकारी पतसंस्था या चार संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर उर्वरित संस्थांच्या निवडणुका पुढील ५ टप्प्यांत होण्याची शक्यता आहे.