स्टेडियम परिसरात स्वच्छतेची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST2021-04-08T04:17:25+5:302021-04-08T04:17:25+5:30
घरकुलांच्या कामांना लागेना मुहूर्त परभणी : पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी परवानगी ...

स्टेडियम परिसरात स्वच्छतेची कामे
घरकुलांच्या कामांना लागेना मुहूर्त
परभणी : पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मागच्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ही कामे ठप्प आहेत. त्यामुळे वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांनी घरकुलांचे काम बंद ठेवले होते. आता कोरोनाच्या निर्बंधामुळे बांधकामे बंद आहेत.
राष्ट्रीय महामार्गांचीच कामे संथगतीने
परभणी : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचीच कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वसमत, गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर या चारही मार्गावरील कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्याची हद्द ओलांडल्यानंतर ही कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, जिल्ह्यातच या कामांना गती दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजीपाला उत्पादक आर्थिक अडचणीत
परभणी : मागच्या दोन महिन्यांपासून आठवडी बाजार बंद ठेवल्याने भाजीपाला उत्पादक अडचणीत आहेत. भाजीपाल्याचे बिट होत नाही. शिवाय, परजिल्ह्यात निर्यात होत नसल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची नासाडी होत आहे. परिणामी भाजीपाला उत्पादनावर केलेला खर्च निघणेही दुरापास्त झाले आहे.
नव्या वसाहतींमध्ये सुविधांना फाटा
परभणी : शहरातील नव्या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ते, नाली यासह पाण्याची समस्याही या भागात गंभीर होत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या संसर्गामुळे मनपा प्रशासनाने या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
लघु प्रकल्पांतील पाणीसाठा तळाला
परभणी : गावस्तरावर असलेल्या पाटबंधारे विभागाच्या लघू प्रकल्पांतील पाणीसाठा तळाला गेला आहे. जिल्ह्यात २२ लघू प्रकल्प असून त्यातील १० प्रकल्प कोरडेठाक आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने भूजल पातळीही खालावली असून, गावात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
शनिवार बाजारातील नाली पाण्याने तुंबली
परभणी : शनिवार बाजार भागातील नाली पाण्याने तुंबली असून, या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मागील महिनाभरापासून या नालीची स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नालीची सफाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.