मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:29 IST2025-12-11T12:25:47+5:302025-12-11T12:29:35+5:30
विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २७व्या दीक्षान्त समारंभात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रगतिशील शेतकरी श्रीरंग लाड यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ११ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होत आहे.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी याला मंजुरी दिली आहे. फडणवीस यांनी शेती व शेतकरी विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले व धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. स्मार्ट प्रोजेक्ट आणि पोक्रा तसेच महाराष्ट्र कृषी एआय धोरणामुळे महाराष्ट्र आज भारतातील कृषी क्षेत्रातील ‘लाइट हाऊस स्टेट’ म्हणून उदयास येत आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करणार आहे.
परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड यांचीही या ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवीसाठी निवड केली आहे. राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त ‘दादा लाड कापूस तंत्रज्ञान’ हे त्यांचे सर्वांत मोठे योगदान मानले जाते. २००२-०३ पासून शेतकरी-आधारित संशोधनातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता घटवणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या प्रारंभिक छाटणीची प्रभावी पद्धत विकसित केली. शेंडा खुडणी, अती घन लागवड, ठिबक सिंचन आणि आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेमध्ये प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ देण्याची सूचना केली होती. त्यानुसार ११ जणांची निवड केली.
यांना देणार शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार
१. चंद्रकांत अंबादासराव देशमुख, मु. वरपूड, ता. जि. परभणी
२. यज्ञेश वसंतराव कात बने, मु. धनेगाव, पोस्ट ढोरकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
३. प्रताप किशनराव काळे, मु. धानोरा (काळे), पोस्ट कळगाव, ता. पूर्णा, जि. परभणी
४. श्रीकांत बेलेश्वर आखाडे, मु. वालसावंगी, ता. भोकरदन, जि. जालना
५. सुदर्शन शिवाजी जाधव, मु. गंजेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
६. शरद बाबूराव पाटील, मु. मावलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर
७. भगवान रामजी इंगोले, मु. पोस्ट मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड
८. अण्णासाहेब अर्जुनराव जगताप, मु. सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड
९. सदाशिव वामनराव अडकिने, मु. हिंगणगाव, ता. वसमत, जि. हिंगोली
महिला शेतकरी गट
१. मीरा जनार्धन आवरगंड, मु. माखणी, ता. पूर्णा, जिल्हा परभणी
२. सुनंदा शिवाजी क्षीरसागर, मु. पांगरा, पोस्ट चितेगाव, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.