२६ लाख घेऊन फसवले; संस्थाचालकाने नोकरी तर सोडा शिक्षकास शाळेतही येण्यास बंदी केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:15 IST2025-11-27T18:15:28+5:302025-11-27T18:15:45+5:30
याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

२६ लाख घेऊन फसवले; संस्थाचालकाने नोकरी तर सोडा शिक्षकास शाळेतही येण्यास बंदी केली
परभणी : तुमच्या मुलाला पर्मनंट शिक्षकाची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून संस्थाचालकाने फिर्यादीकडून २६ लाख रुपये उकळण्यात आले. यात फिर्यादीच्या मुलास शाळेत येण्यास मनाई केली. पैसे परत देण्याची मागणी केली असता टाळाटाळ केली. यावरून आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
याप्रकरणी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील नरहरी भुजंगराव चौधरी यांनी गंगाखेड ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यात नमूद केले की, फिर्यादी यांचा मुलगा नितीन याचे शिक्षण बीएसस्सी बीएड झाले आहे. त्याच्यासाठी नोकरीच्या शोधात असताना मिळालेल्या माहितीवरून जुलै २०१८ मध्ये गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील शारदा विद्या मंदिर शाळेवर शिक्षकाची एक जागा रिक्त असल्याचे फिर्यादी यांना नातेवाइकाकडून समजले. यावर पुढे संस्थाध्यक्ष राजकुमार सावंत यांची फिर्यादी आणि इतर काही जणांनी भेट घेतली. यापुढे झालेल्या व्यवहारात गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील शारदा विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष राजकुमार सावंत यांनी फिर्यादी यांच्याकडून आठ ऑगस्ट २०१८ ते १५ जून २०२३ दरम्यान वेळोवेळी २६ लाख रुपये घेऊन नोकरी लावतो असे सांगितले.
पुढे मुलगा नितीन हा शाळेवर जाऊ लागला. त्याच्या ॲप्रूव्हलबाबत वेळोवेळी संस्थाध्यक्ष सावंत यांच्याकडे विचारणा केली असता काळजी करू नका, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सन २०२३ जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर मुख्याध्यापक संजय सावंत यांनी नितीन यास तू शाळेत यायचे नाहीस, असे तोंडी आदेश दिले. त्यावर संस्थाचालक राजकुमार सावंत यांची घरी जाऊन भेट घेतली असता त्यांनी तुमच्या मुलाविरुद्ध चाळीस मुलींची तक्रार असून त्यास संस्थेने काढून टाकले असे म्हटले. यावर पुन्हा फिर्यादीच्या मुलाला शाळेत येण्यास मुख्याध्यापक संजय सावंत यांनी मनाई केली. याबाबत वेळोवेळी पैसे परत देण्याबाबत राजकुमार सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलता गुन्हा दाखल करण्याची भीती घातली. याप्रकरणी राजकुमार सावंत, संजय सावंत या दोघांवर बुधवारी सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करीत आहेत.