सेलू (जि. परभणी) : राजस्थान मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी सेलू शाखेतील बचत खात्यात डिपाॅझिट केलेले ४ लाख ५० हजार ३० दिवसांची मुदत संपवून परत न देता उलट अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी सेलू न्यायालयाच्या आदेशाने शाखाधिकारीसह बँक पदाधिकारी अशा ६ जणांवर सोमवारी रात्री सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अभय लक्ष्मीकांत सुभेदार (रा. सेलू) यांनी राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ शाखा सेलू येथे बचत खाते क्र. ६४/५ मध्ये १ सप्टेंबर २०२३ रोजी ४ लाख ५० हजार ३० दिवसांच्या मुदतीसाठी डिपाॅझिट केले. सुभेदार यांनी मुदत संपल्यानंतर या बँकेत रक्कम काढण्यासाठी विड्राॅल फार्म भरून दिला असता यातील नमूद आरोपींनी सुभेदार यांना अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ करून धमकी दिली. आम्ही तुमचे पैसे देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगून नियोजनबद्ध कट रचून फसवणूक केली.
हतबल झालेले अभय सुभेदार यांनी या प्रकरणी सेलू न्यायालयात १५६ अंतर्गत फिर्याद दाखल केली. युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. मंदार राऊत यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी निकाल दिला. यामध्ये राजस्थानी मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. परळी वैजनाथचे संस्थापक अध्यक्ष चंदुलाल मोहनलालजी बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी. डी. अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय प्रकाश लड्डा, सेलू येथील शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सेलू पोलिस निरीक्षक यांना दिले. पो. नि. दीपक बोरसे यांच्या आदेशाने सहाजणांवर भादंवि कलम ४२०, ४०५, ४०६, १२० (ब), २१८, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.