मंत्रीमंडळाचा निर्णय: परभणीत पहिल्या महिला सूतगिरणीस मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:20 IST2018-10-10T00:20:48+5:302018-10-10T00:20:51+5:30
सहकार तत्वावरील मराठवाड्यातील पहिल्या महिला सूतगिरणीस राज्याच्या मंत्रीमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असून या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

मंत्रीमंडळाचा निर्णय: परभणीत पहिल्या महिला सूतगिरणीस मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: सहकार तत्वावरील मराठवाड्यातील पहिल्या महिला सूतगिरणीस राज्याच्या मंत्रीमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असून या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
परभणी येथील शिवसेनेचे आ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणी- पूर्णा तालुक्याच्या हद्दीवरील ैएरंडेश्वर- नांदगाव शिवारात मराठवाड्यातील पहिली सहकार तत्वावरील जय भवानी महिला सूतगिरणी स्थापन करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. याबाबत १ कोटी ४० लाख रुपयांचे भागभांडवल जमा करुन सर्व कागदपत्रे शासनाला सादर करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आ.डॉ.राहुल पाटील यांनी इचलकरंजी, गुजरातमधील सुरत या शिवाय अन्य शहरांना भेटी देऊन तेथील सुतगिरण्यांच्या कामकाजाची माहिती घेतली होती. त्यानंतरच ही सूतगिरणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील प्रस्तावांना मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता जय भवानी महिला सुतगिरणी उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुतगिरणीची १२ व्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्यासाठी निवडही झाली आहे. या सुतगिरणीमध्ये २५ हजार चरक्यांच्या माध्यमातून व अत्याधुनिक यंत्र सामूग्रीद्वारे सूत तयार केले जाणार आहे. हे सूत इतर ठिकाणी निर्यात करुन परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचा सूतगिरणी संचालक मंडळाचा मानस आहे.
परभणी तालुक्यात यापूर्वी एक सूतगिरणी होती; परंतु, ती बंद पडल्याने तालुक्यातील नव्या सूतगिरणी मंजुरीस अडचण निर्माण झाली. त्यामुळे परभणी- पूर्णा तालुक्याच्या सिमेवर नवी सुतगिरणी स्थापन करावी लागली आहे.