बस, रेल्वे रिकाम्या; प्रवासी घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:21+5:302021-06-09T04:22:21+5:30

कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून एसटी महामंडळाची सेवा बंद होती. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला. जिल्हा ...

Bus, train empty; Travelers at home! | बस, रेल्वे रिकाम्या; प्रवासी घरातच!

बस, रेल्वे रिकाम्या; प्रवासी घरातच!

कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून एसटी महामंडळाची सेवा बंद होती. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानंतर सोमवारपासून जिल्ह्यात बस सेवेला प्रारंभ झाला. त्‍यानुसार परभणी आगारातील १६, जिंतूर १३, पाथरी १९ तर गंगाखेड आगारातून २० बसेसनी दोन दिवस फेऱ्या मारल्या. यामध्ये परभणी आगारातून २३०४, जिंतूर आगारातून २५९२, गंगाखेड आगारातून ३५३८ तर पाथरी आगारातून १५८१ प्रवाशांनी प्रवास केला. या चारही आगारातून बहुतांश बस ह्या रस्त्यावरून रिकाम्या धावल्याचे दोन दिवसात दिसून आले. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बस सेवेला दोन दिवसात प्रवाशांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एसटी मंडळाच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी घट झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे रेल्वेलाही प्रवाशांचा कोरोनाच्या धास्तीमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परभणी रेल्वे स्थानकावरून दररोज १२ रेल्वेच्या माध्यमातून २४ फेऱ्या होत आहेत .त्यातून जवळपास हजार प्रवासी ये-जा करत आहेत. त्यामुळे बस, रेल्वे रिकाम्या धावत असून प्रवासी घरातच थांबण्यास पसंती देत आहेत.

रेल्वेने मुंबईला प्रवाशांची गर्दी

परभणी रेल्वे स्थानकावर मागील काही दिवसापासून मुंबईला जाण्यासाठी केवळ दोन रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये तपोवन ही रेल्वे सकाळी ११ वाजता तर देवगिरी ही रेल्वे रात्री ८ वाजेच्या सुमारास परभणी रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे धावते. परभणी जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने दररोज या दोन गाड्यांना गर्दी होत आहे.

जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाच्या पाथरी, परभणी, गंगाखेड व जिंतूर या चार आगारातील बस सेवेला केवळ जिल्हा अंतर्गतच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बसला दोन दिवसात गर्दी झाल्याचे दिसून आले नाही.

पहिल्याच दिवशी तीन लाखांचे उत्पन्न

परभणी जिल्ह्यातील चार आगारांमधून दोन दिवसापासून ६८ बसेसच्या माध्यमातून फेऱ्या मारण्यात येत आहेत. यामध्ये पहिल्याच दिवशी १० हजार १५ प्रवाशांनी आपला प्रवास पूर्ण केला आहे. यामधून एसटी महामंडळाला ३ लाख २१ हजार ३५९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये परभणी आगाराला ८९ हजार रुपये, जिंतूर ९१ हजार ४७६, गंगाखेड ९१ हजार ९०२ तर पाथरी आगाराला ४८ हजार ९८१ रुपयांचे उत्पन्न पहिल्या दिवशी मिळाले.

Web Title: Bus, train empty; Travelers at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.