बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा केंद्र संचालकावर बोजा; प्राचार्यांचा ‘ताप’ वाढला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST2021-04-20T04:17:55+5:302021-04-20T04:17:55+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात, तर बारावीच्या परीक्षा मे ...

बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा केंद्र संचालकावर बोजा; प्राचार्यांचा ‘ताप’ वाढला !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटी घेण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला, तरी कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापकांचा ताप मात्र वाढला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडाळाने कोऱ्या उत्तरपत्रिका कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना १५ मार्च रोजी दिल्या आहेत. याशिवाय या अनुषंगाने प्राप्त पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टिकर, सिटिंग प्लॅन, ए बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य देण्यात आले आहे. दरवर्षी या परीक्षा फेब्रुवारी व मार्च महिन्यात होतात. आता त्या उशिराने होणार असल्याने परीक्षा केंद्र असलेल्या प्राचार्यांना बोर्डाकडून मिळालेले साहित्य सांभाळून ठेवण्याची कसरत करावी लागत आहे. याशिवाय या परीक्षेसाठी नियुक्त केंद्र संचालकांचीही जबाबदारी चांगलीच वाढली आहे.
परीक्षा अन् पुढील प्रवेश कधी?
शिक्षण विभागाने दहावी-बारावीच्या परीक्षा मे अखेरीस व जूनच्या प्रारंभी होणार असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे या परीक्षा कधी होतील, असा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापकांना पडला आहे. शिवाय परीक्षा झाल्यानंतर अकरावी व अन्य अभ्यासक्रमांचे प्रवेश कधी होणार? असाही प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राचार्यांना पडला आहे.
जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी : २८४८०
बारावीचे विद्यार्थी : २०५५२
बारावीच्या उत्तरपत्रिका व केंद्राचे साहित्य शाळेला प्राप्त झाले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा लांबल्यामुळे हे साहित्य किती दिवस सांभाळावे लागेल हे सांगता येत नाही. हे साहित्य सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी ही प्राचार्यांची आहे. त्यामुळे शाळेत एका सेवकाची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे.
-अनंत शिंदे, प्राचार्य कै. रामकृष्ण बापू विद्यालय, महातपुरी