घराच्या हस्तांतरणासाठी मागितली लाच, पूर्णा नगरपरिषदेच्या लिपिकासह कंत्राटी ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:10 IST2025-05-13T18:10:40+5:302025-05-13T18:10:57+5:30
याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घराच्या हस्तांतरणासाठी मागितली लाच, पूर्णा नगरपरिषदेच्या लिपिकासह कंत्राटी ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
पूर्णा : तक्रारदार यांच्या वडिलांचे संमतीपत्र आधारे घराचे हस्तांतरण तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या नावावर होण्यासाठी पूर्णा नगरपरिषदेच्या लिपिकाने दहा हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच कंत्राटी संगणक ऑपरेटर याने मंगळवारी पंचासमक्ष सापळा कारवाईमध्ये स्वीकारली. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नरहरी गोमाजी सातपुते (लिपिक, मालमत्ता हस्तांतरण विभाग न.प.पूर्णा) आणि रत्नदीप श्रीरंग वाघमारे (कंत्राटी संगणक ऑपरेटर) अशी आरोपी लोकसेवकांची नावे आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांचे संमतीपत्र आधारे घराचे हस्तांतरण त्यांच्या व भावाच्या नावे होण्यासाठी सात मे रोजी न.प. पुर्णा येथे कागदपत्रासह अर्ज दिला होता. या कामासाठी तक्रारदार लोकसेवक नरहरी सातपुते यांना भेटले असता त्यांनी हस्तांतरण कामासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यानंतर आठ मे रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
या तक्रारीची पडताळणी केली असता त्यांनी लाच रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर मंगळवारी पंचासमक्ष सापळा कारवाईदरम्यान लोकसेवक नरहरी सातपुते यांनी मागणी केलेली लाच रक्कम दहा हजार रुपये कंत्राटी संगणक ऑपरेटर रत्नदीप वाघमारे याने स्विकारले. यावर लोकसेवक रत्नदीप वाघमारे यास लाच रकमेसह तसेच नरहरी सातपुते यास देखील ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे.
अंगझडतीमध्ये रत्नदीप वाघमारे याच्याकडे एक मोबाईल, आणि दहा हजार रुपये लाच रक्कम आढळली तर नरहरी सातपुते याच्याकडे एक मोबाईल आढळला. दोन्हीही आरोपींची घर झडती सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी बसवेश्वर जकीकोरे, अल्ताफ मुलानी, सीमा चाटे, अतुल कदम, शेख जिब्राईल, श्याम बोधनकर, कदम, कल्याण नागरगोजे, नरवाडे यांनी केली.