परभणीत खळबळ! निर्जनस्थळी आढळला अज्ञात तरुणीचा मृतदेह, पोलीस तपास सुरू
By राजन मगरुळकर | Updated: July 30, 2025 11:58 IST2025-07-30T11:56:17+5:302025-07-30T11:58:09+5:30
घटनास्थळी नानलपेठ पोलीस, डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक पथकाने धाव घेतली.

परभणीत खळबळ! निर्जनस्थळी आढळला अज्ञात तरुणीचा मृतदेह, पोलीस तपास सुरू
परभणी: शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमेय नगर पाण्याच्या टाकी परिसरात बुधवारी (३० जुलै) सकाळी सुमारास एक तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सातच्या सुमारास नागरिकांना या परिसरात मृतदेह दिसून आला. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.
घटनास्थळी नानलपेठ पोलीस, डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक पथकाने धाव घेतली. प्रारंभिक माहितीवरून मृत तरुणीचे वय अंदाजे १७ ते २० दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह परिसरातील एका निर्जन ठिकाणी आढळल्यामुळे हा अपघात, आत्महत्या की हत्या याबाबत संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसला तरी पोलीस सर्व शक्यतेचा विचार करून तपास करत आहेत. या तरुणीची ओळख पटविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, तसेच स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली जात आहे. संपूर्ण परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. पोलीसांनी मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.