तडजोडीच्या राजकारणात भाजपा ‘मायनस’
By Admin | Updated: September 28, 2014 23:52 IST2014-09-28T23:47:19+5:302014-09-28T23:52:39+5:30
अभिमन्यू कांबळे, परभणी चार महिन्यांपूर्वी देशात नरेंद्र मोदी यांच्या लाटेने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपाने राज्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला

तडजोडीच्या राजकारणात भाजपा ‘मायनस’
अभिमन्यू कांबळे, परभणी
चार महिन्यांपूर्वी देशात नरेंद्र मोदी यांच्या लाटेने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपाने राज्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्ह्याच्या तडजोडीच्या राजकारणात मात्र भाजपा मायनसच असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात स्वबळाच्या भाषेमुळे भाजपाकडून चारही ठिकाणी उमेदवार उभे केले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा तडजोडीच्या राजकारणामुळे फोल ठरली आहे. भाजपाचा एकमेव बालेकिल्ला व तब्बल चार वेळा येथील नेतृत्व करण्याची संधी मिळालेला गंगाखेड विधानसभा मतदारसंघ यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत असलेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे हे चांगलेच नाराज झाले आहेत. याच नाराजी नाट्यावरुन रविवारी परभणीत भाजपाच्या दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.सुभाष कदम यांनी पोलिसात तक्रारीही दिली आहे. दुसऱ्या गटाकडून मात्र कसलीही तक्रार देण्यात आलेली नाही.
पत्रकार परिषदेनंतर झालेल्या या नाट्यामुळे भाजपाचा नैतिकपणाही चव्हाट्यावर आला आहे. नेहमीच आम्ही इतरांपेक्षा वेगळे, असा टेंभा मिरविणारा भाजपाही इतरांसारखाच आहे, हे यावरुन दिसून आले. पक्षाच्या उमेदवारीवरुन व जागा सोडल्यावरुन घडलेल्या या नाट्यावरुन एक जुना चर्चेला आलेला किस्सा आठवणीला आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात एकदा भाजपाचे खा.हुकूमचंद कुशवाह यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारले होते. त्यावेळी कुशवाह यांनी ‘पक्षाने मला तिकीट नाही दिले तर मी आत्महत्या करेल’ अशी धमकी दिली होती. या विषयावर पत्रकारांनी अटलबिहारी वाजपेयी यांना छेडले व तुमचा खासदार तिकीट नाही मिळाल्यास आत्महत्या करतो म्हणतो, मग इतरांपेक्षा तुमचा पक्ष वेगळा काय? असा सवाल केल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी शांतपणे उत्तर दिले, ते म्हणाले की, हेच तर आमचे वैशिष्ट्ये आहे. आमचा खासदार आत्महत्या करतो म्हणतो, पण पक्ष सोडेन असे म्हणत नाही. हीच नैतिकता आता मात्र लयास गेल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय रविवारी परभणी आला. गंगाखेडच्या जागेवरुन हाणामारी झाली असली तरी पाथरीतही पक्षाला उमेदवार देता आलेला नाही. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तडजोडीच्या भाजपाच्या राजकारणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. याला फक्त मित्र पक्षाला जागा बहाल केल्याचे नाव देण्यात येते, एवढेच काय ते ....
सगळी भांडी खापराचीच
इतरांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करणारा भाजपा पक्षही वेगळा नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विवेकाच्या गप्पा मारणाऱ्या या पक्षाकडून सातत्याने तडजोडीचे राजकारण केले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे सगळी भांडी खापराचीच, असेच भाजपाबाबतीत म्हणावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कडक शिस्तीमध्ये येथील कार्यकर्ता तयार होतो, असे म्हटले जाते. परंतु, जिल्ह्यातील भाजपाचे राजकारण पाहता, ही कडक शिस्त जाते तरी कुठे, असा सवाल उपस्थित होतो. मग ते जिल्हा परिषदेतील राजकारण असो की, नगर पालिकेतील राजकारण असो. स्थिती सारखीच आहे.