परभणीत मोर्चाद्वारे विरोधकांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:59 PM2018-09-26T23:59:56+5:302018-09-27T00:00:21+5:30

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी, भाकप, समाजवादी पार्टी आदी विविध विरोधी पक्षांच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चातून सत्ताधारी भाजप व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला़ या मोर्चातून २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांची झलक परभणीकरांना अनुभवयास मिळाली़

BJP-Shiv Sena attack on opponents of Parbhani | परभणीत मोर्चाद्वारे विरोधकांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल

परभणीत मोर्चाद्वारे विरोधकांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी, भाकप, समाजवादी पार्टी आदी विविध विरोधी पक्षांच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चातून सत्ताधारी भाजप व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला़ या मोर्चातून २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांची झलक परभणीकरांना अनुभवयास मिळाली़
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली असून, शेतकरी, शेतमजूर, निराधार, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आदींचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत़ असे असताना खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी, समाजवादी पार्टी, भाकप आदी पक्षांच्या वतीने बुधवारी जिल्हा कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ त्यानुसार शहरातील शनिवार बाजार भागातील काँग्रेस भवन परिसरात विविध विरोधी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी जमा झाले़ त्यानंतर १२़३० च्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली़ १़३० च्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला़
यावेळी या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, तुकाराम रेंगे, महापौर मीनाताई वरपूडकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, शेकापचे भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, भाकपचे कॉ़ राजन क्षीरसागर, पीआरपीचे गौतम मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माणिक कदम, रसिका ढगे, किशोर ढगे, नदीम इनामदार, सपाचे मन्सूर खाँ पठाण, युवक काँग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, रविराज देशमुख, भगवान वाघमारे, उपमहापौर माजू लाला, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा जयश्री खोबे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नंदा राठोड, ज्ञानेश्वर जोगदंड, सचिन जवंजाळ, अ‍ॅड़ विष्णू नवले, रवि सोनकांबळे, माधुरी क्षीरसागर, रामभाऊ घाडगे, हरिभाऊ शेळके, हफिज चाऊस आदींची उपस्थिती होती़
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष वरपूडकर यांनी भाजपा व शिवसेनेवर जोरदार टीका केली़ भाजपाच्या धोरणामुळे आज महागाईचा भडका उडाला आहे़ सर्वसामान्य शेतकºयांना हमीभाव मिळत नाही़ त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, असा आरोप केला़ यावेळी अ‍ॅड़ परिहार, ढगे, क्षीरसागर, गोळेगावकर, रेंगे, सोनकांबळे, हफिज चाऊस आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग यांनी केले़ आभार शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी मानले़
...या मागण्यांचे दिले निवेदन
मोर्चानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यामध्ये केंद्र शासनाच्या राफेल विमान घोटाळा प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची नेमणूक करावी, प्रस्तावित वीज, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ कमी करावी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची नाफेडमार्फत खरेदी करून शेतकºयांना हमीभाव द्यावा, रमाई घरकूल योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, निराधारांच्या अनुदानात वाढ करावी, २०१७ मधील खरीप पीक विम्याचे मंत्र्यांच्या आश्वासनाप्रमाणे वाटप करावे़
मोर्चातील विमान ठरले लक्षवेधी
मोर्चात राफेल या विमानाच्या दोन प्रतिकृती आॅटोवर लावण्यात आल्या होत्या़ या प्रतिकृती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या़ शिवाय मोर्चामध्ये गॅस सिलिंडर, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे व्यंगचित्र, विविध घोषणांची नामफलके लावण्यात आली होती़ तर काहींनी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचा पोषक परिधान केला होता़

Web Title: BJP-Shiv Sena attack on opponents of Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.