आंब्याच्या विक्रीला लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST2021-04-14T04:15:48+5:302021-04-14T04:15:48+5:30
परभणी : शहराच्या बाजारपेठेत जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आणि परराज्यातून आंबा दाखल झाला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यात पडलेला ...

आंब्याच्या विक्रीला लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका
परभणी : शहराच्या बाजारपेठेत जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आणि परराज्यातून आंबा दाखल झाला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि कोरोनाच्या लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका आंब्यांच्या विक्रीवर होत असल्याचे व्यापारीवर्गातून बोलले जात आहे. परिणामी, आंब्यांचा गोडवा यंदा काहीसा कमी झाल्याचे दिसून येते.
परभणी शहरासह जिल्ह्यात आंध्रप्रदेश, गुजरात, कोकण आणि मराठवाड्यातील बीड, लातूर येथून आंबा दाखल होतो. दरवर्षी अक्षयतृतीयेपासून आंबा खाण्याचे आणि रसाळी्चे महत्व आहे. तसा मार्चपासून राज्यातील आंबा येथे दाखल होतो. परभणीतील बाजारपेठेत बदाम, लालबाग, केशर, दशहेरी, हापूस आणि काहीसा गावरान आंबा विक्रीसाठी येतो. यामध्ये यंदा बदाम आणि लालबागच्या खरेदीला ग्राहकांची
पसंती आहे. काही प्रमाणात दर सध्या तरी कमी आहेत. आधीच व्यापारी लाॅकडाऊनने त्रस्त असताना त्यात पावसामुळे विक्रीचे नुकसान होत आहे.
असे आहेत दर
बदाम - ५० ते ६० रुपये किलो
लालबाग - ४० ते ५० रुपये किलो
केशर - ११० ते १२० रुपये किलो
दशहेरी - ११० ते १२० रुपये किलो
कोकणच्या राजाची एक हजाराला पेटी
परभणीत कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. यात देवगड, रत्नागिरी यासह परिसरातील विविध भागातून कोकणचा राजा दाखल होतो. त्याची मागणी पाहता यंदा एक हजार रुपयाला पेटी विकली जात आहे.
लाॅकडाऊनने नुकसान
मागील वर्षीसह याहीवर्षी लाॅकडाऊनने विक्रीवर परिणाम झाला आहे. पावसाचा फटका बसला तो तर वेगळाच. विक्री होत असली तरी त्याचा फायदा व्यापाऱ्यांना अद्याप झाला नाही.
- सय्यद नईम सय्यद इब्राहीम, आंबा विक्रेते.