'चांगले काम करून आयुष्यात यशस्वी व्हा'; राज्यपालांचा विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमाचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 14:42 IST2021-08-07T14:41:06+5:302021-08-07T14:42:38+5:30
Bhagat Singh Koshyari's Parabhani visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सब का साथ सब का विकास' दिलेल्या नाऱ्याचे अनुकरण करावे

'चांगले काम करून आयुष्यात यशस्वी व्हा'; राज्यपालांचा विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमाचा सल्ला
परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास करण्यासाठी 'सब का साथ सब का विकास' याचे अनुकरण विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.
परभणी दौऱ्यात शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महिला या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हे सातत्याने दिसून आले आहे. आपल्या आई, वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करून आयुष्यात पुढे गेले पाहिजे. सर्व समाज घटकांचा विकास करण्यासाठी सामाजिक जाणिवेतून काम केले पाहिजे. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सब का साथ सब का विकास' दिलेल्या नाऱ्याचे अनुकरण करावे, चांगले काम करून आयुष्यात यशस्वी व्हावे, तसेच देशाचे नाव उज्ज्वल करावे, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित काही विद्यार्थिनीनी विद्यापीठातील वसतिगृहात चांगल्या सुविधा मिळत असल्याचे सांगितले तर काही विद्यार्थ्यांनी संशोधनातील शिष्यवृत्तीत वाढ करण्याची मागणी केली.
माईक बंद पडत असल्याने अडसर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना येथील माईक अधूनमधून बंद पडत होता. त्यामुळे संवाद साधताना अडथळा निर्माण होत होता. शिवाय सभागृहातील आवाज धुमत असल्यानेही उपस्थितांची चांगलीच अडचण झाली.