Bad condition of Parbhani-Manavat road; One hour for a distance of 30 km! | परभणी-मानवत रस्त्याची दुरावस्था; ३० कि.मी.च्या अंतरासाठी तब्बल एक तासाचा वेळ !

परभणी-मानवत रस्त्याची दुरावस्था; ३० कि.मी.च्या अंतरासाठी तब्बल एक तासाचा वेळ !

ठळक मुद्देअगणित खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मन:स्तापमागील दोन वर्षांपासून रस्त्याचे काम ठप्प

परभणी : जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर असलेले मानवत हे तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी वाहनधारकांना चक्क एक तासांचा वेळ खर्ची घालावा लागत आहे. रस्त्यावर एक-एक फुटावर असलेल्या खड्ड्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यात वाताहत झाली आहे. 

कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मानवत या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे बीड, नगर, पुणे जिल्ह्यात जाण्यासाठीही याच मार्गाचा वापर होतो.  पाथरी तालुक्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. मात्र त्यापुढे मानवत ते परभणीपर्यंतचा रस्ता एका बाजूने खोदून ठेवला आहे. त्यापुढील काम ठप्प आहे. अस्तित्त्वात असलेल्या रस्त्यावर एक-एक फुटावर खड्डे पडल्याने खड्डे चुकवित वाहने चालविताना वाहनधारकांना अक्षरश: कसरत करावी लागते. त्यात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील एक महिन्यात या रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढली आहे. दोन ते तीन प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. आधीच रस्त्यांवर खड्डे त्यात पुन्हा खोदकाम करुन ठेवले असल्याने वाहनधारकांची गोची होत आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर मोठी वाहतूक आहे. शिवाय मानवत, पाथरी या तालुक्यातील नागरिकांना जिल्हा गाठण्यासाठी हाच रस्ता आहे. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता
परभणी ते मानवत हा जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. विशेष म्हणजे या मार्गावर बीड, नगर, पुणे, नांदेड, हिंगोलीकडे जाणारी वाहने सर्वाधिक आहेत. मात्र मागील दोन वर्षांपासून रस्त्याचे काम ठप्प झाल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. 

३० कि.मी.चे अंतर
परभणी ते मानवत हे केवळ ३० कि.मी. चे अंतर आहे. सर्वसाधारण गतीनेही वाहने चालविली तर अर्ध्या तासात मानवत शहर गाठणे शक्य होते. मात्र या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत आणि रस्ता अनेक भागात खोदून ठेवला आहे. त्यामुळे खड्डे चुकवित वाहने चालविताना वाहनधारकांना दुप्पट वेळ खर्च करावा लागत आहे. या रस्त्याचे काम दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. महामार्ग प्राधिकरणही या बाबीकडे गांभिर्याने पाहत नसल्याने खड्डेमय रस्त्याची समस्या कायम आहे.

परभणी ते मानवत हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. एका बाजूने रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून, वाहतुकीसाठी ठेवलेल्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने सावकाश चालवावी लागत आहे.  हा त्रास दररोजचा असल्याने त्रस्त झालो आहे.
-बाळू मोते, वाहन चालक

मानवत-परभणी रस्त्यावर १९ कि.मी. अंतराचे रस्त्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी कोरोनाच्या संकटामुळे काम ठप्प झाले होते. आता या कामाला गती दिली असून, मार्च २०२१ पूर्वी या रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करुन घेतले जाणार आहे.
-स्वप्नील रुद्रवार, सहायक अभियंता, महामार्ग

Web Title: Bad condition of Parbhani-Manavat road; One hour for a distance of 30 km!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.