काव्य उत्सवातून स्त्री शक्तीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:21+5:302021-02-05T06:04:21+5:30
परभणी : येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन काव्य उत्सवात जिल्ह्यातील अनेक कवींनी सहभाग नोंदवत स्त्री ...

काव्य उत्सवातून स्त्री शक्तीचा जागर
परभणी : येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन काव्य उत्सवात जिल्ह्यातील अनेक कवींनी सहभाग नोंदवत स्त्री शक्तीचा जागर केला. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या संमेलनातून जनजागृती करण्यात आली. येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त निमंत्रित कवींचे ऑनलाइन संमेलन घेण्यात आले. त्यात प्रा. सुरेश हिवाळे, डॉ. अशोक पाठक, राही कदम, शरद ठाकर, अरविंद सगर, सुषमा गंगूलवार, दिगंबर रोकडे, मनीषा आंधळे यांनी कवितांचे सादरीकरण केले. ‘किती दिवस झुरशील मनात अन् किती दिवस मरशील अशी, जिजाऊ, ताराराणी, सावित्रीशी नातं तुझं, हे तू विसरलीस कशी, तू शक्ती वात्सल्य, करुणा, अंगारही, हाती घेतलेल्या लेखणीला लावून धार उतरवं तुझ्या गुलामगिरीचा भार’ या कवितेतून प्रा. सुरेश हिवाळे यांनी स्त्रियांमधील क्षमतेची जाणीव करून दिली. कवी शरद ठाकर यांनी ‘तुझ्या मनीचं गुपित तुझ्या ओठ्यावर यावं, तुझं गुज ऐकण्याला काळजाचं कान व्हावं’ ही कविता सादर केली. मनीषा आंधळे यांनी निसर्गातील जुईच्या गुणाचा महिमा गायला. रूप, गंध, शुभ्रमता सारेच जुईच्या ठाई, अवगुणाची चाडही नसे तिच्या पायी ही कविता सादर केली. तसेच राही कदम यांनी कवितेतून मराठी भाषेचा गौरव केला. परभणीचे गजलकार अरविंद सगर यांनी गजल सादर करून वस्तुस्थिती मांडली. प्रा. प्रल्हाद भोपे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. राजू बडुरे यांनी आभार मानले.