नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती पोहोचली ४५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST2021-01-04T04:15:27+5:302021-01-04T04:15:27+5:30
परभणी : जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर अवघ्या एक महिन्यामध्ये या वर्गातील विद्यार्थ्यांची ...

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती पोहोचली ४५ टक्क्यांवर
परभणी : जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर अवघ्या एक महिन्यामध्ये या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४६ टक्क्यांवर पोहोचली आहे. ही बाब सकारात्मक असून, हळूहळू विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या. आठ महिन्यांपर्यंत या शाळा बंद राहिल्या असल्या तरी ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यात आले. शहरी भागातील हे वर्ग आणखी उशिराने सुरू झाले. सुरुवातीच्या काळात या वर्गांमध्ये बोटावर मोजण्याइतकीच विद्यार्थी संख्या होती. ती आता वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने घेतलेल्या अहवालानुसार ४५.६२ टक्के उपस्थिती झाली आहे.
३९ हजार विद्यार्थी शाळेत दाखल
जिल्ह्यात नववी आणि बारावीपर्यंतच्या वर्गात ८६ हजार ६१० विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. या महिनाभरात वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३९ हजार ८४१ वर पोहोचली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय आहे.
४ हजार ९०० शिक्षकांमार्फत शिकवणी
नववी ते बारावी या वर्गासाठी जिल्ह्यातील ५९४ शाळांमध्ये ५ हजार १९७ शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, ४ हजार ९०६ शिक्षकांमार्फत वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
नववी आणि बारावीचे वर्ग सुरू केले तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. मात्र, शिक्षण विभागाने कोरोनाच्या अनुषंगाने सर्वतोपरी काळजी घेत वर्ग सुरू केले. त्यामुळे पालकांचा विश्वास वाढला. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता जाणवू लागली. परिणामी, उपस्थिती वाढली आहे.
-डॉ. सूचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी