पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:43+5:302021-03-27T04:17:43+5:30
याबाबत सविस्तर वृत्त असे, दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी दीपक मुदीराज, फौजदार विश्वास खोले व वाघमारे हे २४ मार्च ...

पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न
याबाबत सविस्तर वृत्त असे, दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी दीपक मुदीराज, फौजदार विश्वास खोले व वाघमारे हे २४ मार्च रोजी अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पूर्णा तालुक्यात गस्तीवर होते. पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू घेऊन कंठेश्वर येथून हड्डी कारखाना येथे टिप्पर येत असल्याची माहिती त्यांना गुप्त सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे एटीएस पथकातील हे कर्मचारी येथील रस्त्यावर थांबले असता, त्यांना एमएच ०४ डीडी ३२७२ क्रमांकाचा टिप्पर येताना दिसला. त्यांनी या टिप्परला थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी टिप्पर चालकाने सदरील वाहन न थांबवता वेगाने चालवून पोलीस कर्मचारी दीपक मुदीराज यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मुदीराज यांनी जवळील दुचाकी सोडून तात्काळ बाजूला उडी मारली. व पाहिले असता टिप्परमध्ये शेख बब्बर शेख बिबन (रा. धनगर टाकळी, ता. पूर्णा) व अन्य एक व्यक्ती दिसून आला. त्यानंतर वाहनासह चालक पळून गेला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला असता तो या परिसरातील रिलायबल फॅक्ट्रीमध्ये गेला. पोलीस कर्मचारी त्या फॅक्ट्रीच्या गेटजवळ पोहोचले असता येथील सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यामुळे पूर्णा येथील अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतरही पोलिसांना अर्धा तास बसवून ठेण्यात आले. आतमध्ये गेलेला टिप्पर बाहेर पाठवा, म्हणल्यावरही तो पाठवला गेला नाही. पोलिसांना बोलण्यात व्यस्त ठेऊन अन्य गेटद्वारे हा टिप्पर बाहेर काढून दिला. याबाबत पोलीस कर्मचारी दीपक मुदीराज यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी शेख बब्बन शेख बिब्बन, शेख जावेद शेख गुलाब, सुलेमान व समद (पूर्ण नाव माहीत नाही) या ४ जणांविरूद्ध विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.