क्रेडीट कार्ड बंद करण्यास अर्ज दिला अन सव्वालाख रुपये काढल्याचा मेसेज आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:53 IST2020-12-19T19:49:47+5:302020-12-19T19:53:11+5:30
परभणीतील भारतीय स्टेट बँकेत त्यांचे क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज दिला होता.

क्रेडीट कार्ड बंद करण्यास अर्ज दिला अन सव्वालाख रुपये काढल्याचा मेसेज आला
परभणी : क्रेडीट बंद करण्याचा अर्ज बँकेत दिल्यानंतर मोबाईलवर एका महिलेने कार्डचा नंबर विचारून १ लाख २३ हजार २३७ रुपयांची रक्कम काढून घेतल्याचा प्रकार १७ डिसेंबर रोजी घडला असून, या प्रकरणी धारासूर येथील एका आरोग्य कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारासूर येथील आरोग्य केंद्रात सहाय्यक म्हणून काम करणारे बाळू भगवानराव पवार हे परभणीतील कारेगाव येथे राहतात. १६ डिसेंबर रोजीच त्यांनी परभणीतील भारतीय स्टेट बँकेत त्यांचे क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज दिला होता. त्यानंतर त्यांना १७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता ८००६१२४०३६ या मोबाईलवरून एका महिलेचा फोन आला व सदरील महिलेने भारतीय स्टेट बँकेतून बोलत आहे. तुमचे क्रेडीट कार्ड बंद करायचे आहे. नंबर सांगा, म्हटले. त्यामुळे बाळू पवार यांनी नंबर सांगितला. त्यानंतर याच दिवशी तीन वेळा त्यांच्या क्रेडीट कार्डमधून १ लाख २३ हजार २३७ रुपये काढण्यात आले.
याबाबतचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आल्यानंतर पवार यांनी १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भारतीय स्टेट बँकेत जाऊन तक्रार केली. त्यानंतर त्यांचे क्रेडीट कार्ड ब्लॉक करण्यात आले. याबाबत बाळू पवार यांनी परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून ८००६१२४०३६ या क्रमांकाच्या मोबाईल धारक महिलेविरुद्ध शुक्रवारी रात्री १०.२१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, ग्राहकांची ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत.