परभणीत जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर रात्रीतून पुन्हा अतिक्रमणाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:05 IST2025-11-03T15:04:16+5:302025-11-03T15:05:05+5:30
परभणीतील प्रकार : शिक्षण विभागाची पुन्हा अज्ञाताविरुद्ध फिर्याद

परभणीत जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर रात्रीतून पुन्हा अतिक्रमणाचा प्रयत्न
परभणी : शहरातील जिल्हा परिषद बहुविध प्रशाला परिसरातील गट नंबर २९३ च्या परिसरात दुसऱ्यांदा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न रविवारी रात्री झाला. यामध्ये सिमेंट काँक्रीटचे पोल उभारून भिंत बांधण्याचे धाडस सुद्धा झाले. यापूर्वी २० ऑक्टोबरला भर दिवसा सिमेंट पोल उभारण्याचे काम झाले होते. या दोन्ही प्रकरणात शिक्षण विभागाने अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करून सावध भूमिका घेतली आहे.
संभाजीनगर परिसरातील या शासकीय जागेच्या संदर्भात वाद सुरू आहे. हे प्रकरण ऑक्टोबर महिन्यात दिवसा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याने उजेडात आले. यामुळे जिल्हा परिषद तसेच शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणा यासह सर्वच विभागांची सदरील शासकीय जागेवरील अतिक्रमणाच्या होणाऱ्या प्रयत्नामुळे भंबेरी उडाली आहे.
पुन्हा एक गुन्हा नोंद
जिल्हा परिषद बहुविध प्रशालेचे मुख्याध्यापक अब्दुल वसीम अब्दुल रशीद यांनी या प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गट नंबर २९३ मध्ये अज्ञात इसमांनी रविवारी रात्रीच्या वेळी सिमेंट काँक्रीटचे पोल उभारून अतिक्रमण केल्याचा गुन्हा सोमवारी दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर करीत आहेत. यापूर्वी असाच एक गुन्हा गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी याच प्रकरणात अतिक्रमण केल्याचा अज्ञाताविरुद्ध नोंद केला होता. रविवारच्या प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.