दुहेरी रेल्वे मार्गाचा प्रकल्प गुंडाळल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:28+5:302021-02-09T04:19:28+5:30
परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण झाले आहे. मात्र चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी एकही रुपया मंजूर ...

दुहेरी रेल्वे मार्गाचा प्रकल्प गुंडाळल्याने संताप
परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण झाले आहे. मात्र चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी एकही रुपया मंजूर न करता काही काळाकरीता हा प्रकल्प थंड बस्त्यात टाकण्याचा निर्णय दक्षिणमध्य रेल्वेने घेतला आहे.त्यामुळे मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने या निर्णयाचा निषेध केला आहे.
नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून त्यात द.म.रे. अंतर्गत विजयवाडा, गुंटुर, गुडूर, महेबुबनगर आदी ठिकाणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद केली आहे.मात्र मराठवाड्यातील अत्यंत महत्वाचा असलेल्या परभणी- मनमाड दुहेरीकरणााठी छदामही मंजूर केलेला नाही. या मार्गाच्या सर्वेक्षणानंतर प्रकल्पासाठी २१९९ कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र द.म.रेने हा प्रस्ताव बासनात बांधून ठेवला आहे.सध्या परळी-बीड-नगर आणि दौंड-नगर दुहेरीकरणाचे कारण देत परभणी- मनमाड दुहेरीकरण काही काळासाठी थांबविण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेला प्रकल्प करायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठवाड्यातून द.म.रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळतो. मात्र विकासकामांवर सर्वाधिक खर्च आंध्रप्रदेशात केला जातो. परभणी- मनमाड दुहेरीकरणाचा प्रकल्प थंड बस्त्यात ठेवल्याने या भागात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन लवकरच मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, डॉ.राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा, खदीरलाला हाश्मी, प्रविण थानवी,अशिष कांकरिया, दयानंद दीक्षित आंदीनी दिला आहे.