असुविधांमुळे प्रवाशांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:50 IST2021-01-08T04:50:57+5:302021-01-08T04:50:57+5:30
जिल्ह्यात रखडली पीक कर्ज प्रकरणे परभणी : जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाची अनेक प्रकरणे रखडली आहेत. रबी हंगामातही बँकांनी कर्ज ...

असुविधांमुळे प्रवाशांत संताप
जिल्ह्यात रखडली पीक कर्ज प्रकरणे
परभणी : जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाची अनेक प्रकरणे रखडली आहेत. रबी हंगामातही बँकांनी कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ केली असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतरही याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे खरिपाबरोबरच रबी हंगामातही बँकांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट अपूर्णच आहे.
कापसाची आवक वाढल्याने तारांबळ
परभणी : महाराष्ट्र राज्य पणन महासंघाने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू केली आहे. परभणी शहरात सहा जिनिंगवरून ही खरेदी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात कापसाची आवक झाल्याने कापूस साठवण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. परिणामी पणन महासंघाला कापूस खरेदी तात्पुरती बंद ठेवावी लागली. सध्या कापूस खरेदी बंद असून, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता, पुन्हा खरेदीला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
दुहेरी रेल्वे मार्गाचे काम ठप्प
परभणी : परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने पुढील काम ठप्प पडले आहे. रेल्वे प्रशासनाने केवळ धर्माबाद ते परभणी या मार्गाचेच दुहेरीकरण केले असून, परभणी ते मनमाड या मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
शासकीय कार्यालयात बगिचाची दुरवस्था
परभणी : येथील प्रशासकीय इमारत भागातील बगिचाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी विविध फुलांची झाडे लावण्यासाठी संरक्षक भिंत तयार करण्यात आली. सुरुवातीला काही झाडे लावण्यात आली. मात्र, त्यानंतर बगिचाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा परिसर भकास झाला आहे.
अवैध वाळू उपसा सुरूच
परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतली असून, या संधीचा फायदा घेत वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू केला आहे. विशेष म्हणजे, पूर्णा, परभणी या भागात दररोज वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही या वाळू उपशाला पायबंद बसलेला नाही.