पंढरपूर दर्शनानंतर गावी परतणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 18:37 IST2023-06-30T18:36:58+5:302023-06-30T18:37:23+5:30
अकोला येथील वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू झाल्याचे गंगाखेड तालुक्यातील सुरळवाडी येथे उघडकीस आले

पंढरपूर दर्शनानंतर गावी परतणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू
गंगाखेड: पंढरपूर येथून दर्शन घेऊन बसने गावी परतणाऱ्या वृद्ध गावकऱ्याचा बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे १. ३० वाजता मृत्यू झाल्याची घटना सुरळवाडी फाटा येथे उघडकीस झाली. नरेंद्र अनंतराव कळाने ( ७५) असे मृत वारकऱ्याचे नाव असून ते अकोला येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
आषाढी एकादशीनिमित्त अकोला येथील नरेंद्र अनंतराव कळाने सहकाऱ्यांसह पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते सहकाऱ्यासह पंढरपूर-अकोला बसने ( क्रमांक एम.एच.४० सिएम.३५२०) परत निघाले. दरम्यान, परळी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सुरळवाडी फाटा परिसरात गावी परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी नाष्ट्याची सोय केली होती.
पहाटे १:३० वाजता बस येथे थांबली. सर्व प्रवासी खाली उतरले मात्र नरेद्र कळाने बसून राहिले. सोबत असलेल्या प्रवाशाने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कळाने यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यानी त्यांना उपजिल्हारूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देशमुख यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.