सीसीआयने अडवली सेझची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:29+5:302021-04-13T04:16:29+5:30
मानवत : यंदाच्या कापूस हंगामात सीसीआयने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र ...

सीसीआयने अडवली सेझची रक्कम
मानवत : यंदाच्या कापूस हंगामात सीसीआयने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र सेझची रक्कम कमी केल्याचा वादातून बाजार समितीला मिळणारी रक्कम सीसीआयने अडवल्याने बाजार समिती आर्थिक संकटात सापडल्या आहेत.
२० नोव्हेंबरपासून सीसीआयने हमीदाराने कापसाची खरेदी सुरू केली होती. पर जिल्ह्यासह जिल्हाभरातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र दिसून येत होते. दररोज ८०० ते ९०० वाहन बाजार समितीचे यार्डात येऊ लागले. नोव्हेंबर, डिसेंबर तसेच जानेवारी या तीन महिन्यांत शेतकरी मानवत केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत होते. दररोज दहा हजार क्विंटल आवकची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे होत होती. ३० जानेवारीपर्यंत सीसीआयने तीन लाख ९४ हजार कापसाची हमीदराने खरेदी केली. मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कापसामध्ये टप्प्याटप्प्याने भाव वाढ होत असल्याचे चित्र दिसून आले. भाववाढीचा परिणाम सीसीआईच्या खरेदीवर झाला होता. यामुळे सीसीआयचे केंद्रप्रमुख शंकरलाल गलगठ यांनी १३ फेब्रुवारीपासून सीसीआयची कापूस खरेदी कायमस्वरूपी बंद केली. दरम्यान, सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाचा सेझ मिळावा, यासाठी बाजार समितीने जानेवारी महिन्यापासून पाठपुरावा सुरू केला. मात्र आर्थिक वर्ष संपले तरी सीसीआयने बाजार समितीच्या सेझची रक्कम दिली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मानवत बाजार समितीसह जिल्ह्यात ज्या बाजार समितीच्या यार्डात सीसीआयची खरेदी झाली आहे. अशा सर्व बाजार समितीला अद्यापही सेझची रक्कम न मिळाल्याने या बाजार समिती ही आर्थिक संकटात सापडल्या आहेत.
बॉक्स
सेझ ५० टक्के कमी केल्याने वाद
कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्डात कापूस खरेदी केल्याबद्दल १ रुपया १० पैसे याप्रमाणे सीसीआय बाजार समितीला बाजार फी देत असते. मात्र यावर्षी सीसीआयने या बाजार समितीला देण्यात येणाऱ्या सेझमध्ये ५० टक्के घट केली आहे. सीसीआयने पत्र काढून ५५ पैसे प्रमाणे बाजार फीची रक्कम देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र या निर्णयाला बाजार समितीने विरोध केला आहे. बाजार फीची रक्कम कमी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन, व्यवस्थापन, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा यावर परिणाम होणार आहे. बाजार समितीचा डोलारा चालवणे अवघड होणार आहे.त्यामुळे पूर्वीप्रमाणे १ रुपया ५ पैसेप्रमाणे बाजार फीस सीसीआयने द्यावी, अशी मागणी बाजार समित्याकडून होत आहे.
एक कोटींचा फटका
मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. १ रुपया ५ पैसे प्रमाणे २ कोटी २५ लाख रुपये फीस मिळाली असती. मात्र सीसीआयच्या निर्णयामुळे ५५ पैसे प्रमाणे केवळ १ कोटी १२ लाख रुपये मिळतील. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नाला एक कोटींचा फटका बाजार समितीला बसणार आहे. यामुळे मानवत बाजार समितीसह औरंगाबाद विभागातील ४८ बाजार समित्यांचा या निर्णयाला कडाडून विरोध होत असल्याचे चित्र आहे.