भेटीगाठीसोबतच मदतही आटली; वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST2021-04-21T04:17:35+5:302021-04-21T04:17:35+5:30
पाथरी : आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबापासून दूर वृद्धाश्रमात राहणाऱ्या येथील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाने आणखीच दूर सारले असून, मदत आटली ...

भेटीगाठीसोबतच मदतही आटली; वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी !
पाथरी : आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबापासून दूर वृद्धाश्रमात राहणाऱ्या येथील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाने आणखीच दूर सारले असून, मदत आटली असून, भेटीगाठीही ठप्प झाल्याने हे नागरिक एकाकी पडले आहेत.
पाथरी शहरापासून ३ कि.मी. अंतरावरील ओंकार वृद्धाश्रमात भेट देऊन कोरोना संसर्ग काळात या ज्येष्ठ नागरिकांची काय स्थिती आहे, हे जाणून घेतले. या वृद्धाश्रमात प्रत्येक महिन्यात समाजसेवी नागरिक भेट देत असत. मुलांचे वाढदिवस, जयंती, उत्सव सोहळे या ठिकाणी ज्येष्ठांसमवेत साजरे होते. या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना काही मदतही दिली जात होती. मात्र कोरोनाने हे सर्व थांबले आहे.
ओंकार वृद्धाश्रमात एकूण ३७ वृद्ध राहतात. ते सर्व ६५ ते ८५ वर्ष वयोगटातील आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. नागरिकांना एकमेकांत ठरावीक अंतर ठेवण्याचे निर्देश दिले जात आहेत. आधीच कुटुंबापासून दूर राहणाऱ्या या वृद्धांना तर आता आणखीच दुरावा वाढला आहे. मागच्या दोन महिन्यांपासून हे नागरिक एकाकी जीवन जगत आहेत.
मदतही आटली
पाथरी येथील ओंकार वृद्धाश्रमात दाखल झालेल्या वृद्धांना समाजसेवींकडून वेळोवेळी मदत दिली जाते. कधी खाद्यपदार्थांच्या माध्यमातून तर कधी पैशांच्या स्वरूपात ही मदत मिळते. त्यामुळे वृद्धांच्या गरजा भागत होत्या.
मात्र संचारबंदी आणि कोरोनाच्या संसर्गामुळे आता ही मदतही आटली आहे. आता तालुक्यातील समाजसेवी नागरिकांनीही वृद्धांकडे पाठ फिरविली असून, मदतीचा ओघ आटल्याची बाब केलेल्या पाहणीत दिसून आली.
भेटीगाठीही दुरावल्या...
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांच्या वृद्धाश्रमात भेटीगाठी होत होत्या. मात्र सर्व कार्यक्रम ठप्प पडले आणि इतरांच्या भेटीगाठी दुरावल्या. त्यामुळे सुरुवातीला कुटुंबापासून दूर झालेले हे नागरिक कोरोनाच्या संकटामुळे एकाकी पडले आहेत.
भजन, मनोरंजनाचे कार्यक्रम ठप्प
वृद्धाश्रमातील भजन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम मागच्या काही दिवसांपासून ठप्प आहेत. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे विरंगुळाच शिल्लक नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
कोरोनापासून बचावासाठी लसीकरण
वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली जात असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या संवादात नमूद केले.
मनोरंजनासाठी शोधावा लागतो विरंगुळा
समाजातील विविध नागरिकांच्या भेटींमुळे प्रबोधन, मनोरंजन होत होते. मात्र नागरिकांच्या भेटी थांबल्याने आता आमचा आम्हालाच विरंगुळा शोधावा लागत आहे. दिवस मोठा वाटत आहे, अशी व्यथा एका नागरिकांनी व्यक्त केली.