सावकारांकडून पावणेतीन कोटींचे बिगर कृषी कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:51 IST2021-01-08T04:51:21+5:302021-01-08T04:51:21+5:30
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात ९९ सावकार नोंदणीकृत आहेत. या सावकारांनी नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत १ ...

सावकारांकडून पावणेतीन कोटींचे बिगर कृषी कर्ज वाटप
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात ९९ सावकार नोंदणीकृत आहेत. या सावकारांनी नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत १ हजार ३८१ जणांना २ कोटी ७४ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. मात्र, वितरित केलेले सर्व कर्ज बिगर कृषीच्या नावावर आहे. शेतकऱ्यांसाठी व्याजाचे दर कमी आहेत. त्यामुळे कर्ज वाटप करताना शेतीसाठी कर्ज देण्याचे टाळले जाते. परिणामी जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याच्या नावावर सावकारी कृषी कर्ज नाही, हे विशेष.
वर्षात ६४ आत्महत्या
जिल्ह्यात यावर्षीही शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे आली. त्यात अतिवृष्टी, बँकेचे कर्ज वेळेत न मिळणे, नापिकी या संकटांचा समावेश आहे. त्यातूनच वर्षभरात ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील ३४ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली असून, २१ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ९ प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत.
अनधिकृत सावकारी
जिल्हा उपनिबंधकांकडे नोंदणी न करता कर्ज वितरण करणारा प्रत्येक सावकार अनधिकृत ठरतो. अशा सावकारांविरुद्ध तक्रारी आल्यास कारवाई केली जाते. जिल्ह्यात या वर्षी अवैध सावकारीच्या १९ तक्रारी दाखल झाल्या असून, ८ ठिकाणी पथकाने छापे टाकले. त्यात एका जणाविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी
अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला नऊ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८ टक्के व्याजदर आकारला जातो.