Video : कौतुकास्पद ! आजारी वृद्धेस धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत नेले रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 16:21 IST2021-07-22T16:12:59+5:302021-07-22T16:21:30+5:30

Rain in Parabhani : दहेगाव येथे ओढ्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते

Admirable! The sick old women was taken to the hospital by brave youths who made their way through the flood | Video : कौतुकास्पद ! आजारी वृद्धेस धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत नेले रुग्णालयात

Video : कौतुकास्पद ! आजारी वृद्धेस धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत नेले रुग्णालयात

ठळक मुद्देओढ्याला मोठ्याप्रमाणात पाणी येऊन चार ते पाच फुट पाणी पातळी वाढली होतीपाण्याचा तीव्र प्रवाह असल्याने मानवी साखळी करून वृद्धेस सुखरूप बाहेर काढले

जिंतूर ( परभणी ) : तालुक्यातील दहेगाव येथील ओढ्यास पूर आला असून यावर पूल नसल्याने गावचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत गावातील एका आजारी वृद्धेस सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुखरूपपणे दुसऱ्या टोकास नेत दवाखान्यात दाखल केले. प्रसंगावधान राखून सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. 

तालुक्यातील दहेगाव येथे ओढ्यावर पूल नसल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यातच मागील चार दिवसांपासून संततधार पावसाने ओढे, नद्यानाले तुडूंब भरून वाहत आहेत. दहेगाव येथील ओढ्यास पावसामुळे पूर आला होता. यामुळे गावाचा संपर्क तुटला. दरम्यान, येथील हरिबाई ढोणे या वृद्ध महिलेस प्रचंड त्रास सुरु  झाला. त्यांना तीव्र ताप असल्याने तातडीने उपचाराची गरज होती. त्यांना उपचारासाठी बाहेर गावातील दवाखान्यात नेण्यासाठी नातेवाईकांनी काही काळ ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहिली. परंतु, ताप वाढत गेल्यामुळे हरीबाई यांची प्रकृती गंभीर होत गेली. 

याची माहिती गावचे सरपंच सूर्यभान जाधव यांना मिळाली.  परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी दिलीप ढोणे, परमेश्वर ढोणे, संतोष ढोणे यांच्या सहकार्याने हरीबाई यांना ओढा पार करून दवाखान्यात नेण्याचे ठरवले. ओढ्याला मोठ्याप्रमाणात पाणी येऊन चार ते पाच फुट पाणी पातळी असताना त्यातून वाट काढणे मोठ्या जिकरीचे होते. मात्र, जाधव व सहकाऱ्यांनी हरीबाई आणि यांच्या नातेवाईकांना धीर दिला. पाण्याचा तीव्र प्रवाह असल्याने मानवी साखळी करून हरीबाई यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल केले असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. दरम्यान, मागील 20 ते 25 वर्षांपासून दहेगाव येथील ग्रामस्थांची ओढ्यावर पूल करण्याची मागणी आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Admirable! The sick old women was taken to the hospital by brave youths who made their way through the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.