दररोज १५ टन प्राणवायूसाठी प्रशासनाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST2021-04-20T04:17:53+5:302021-04-20T04:17:53+5:30

परभणी : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्याला दररोज १५ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत असून, हा ऑक्सिजन साठा जमविण्यासाठी दररोज ...

Administration exercise for 15 tons of oxygen per day | दररोज १५ टन प्राणवायूसाठी प्रशासनाची कसरत

दररोज १५ टन प्राणवायूसाठी प्रशासनाची कसरत

परभणी : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्याला दररोज १५ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत असून, हा ऑक्सिजन साठा जमविण्यासाठी दररोज प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातच ऑक्सिजनचा साठा संपल्याने प्रशासनाला रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी कोरोना रुग्णालयांसाठी दररोज सरासरी १५ ते १६ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. सर्वसाधारण रुग्णाबरोबरच ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने हा ऑक्सिजनचा साठा जमा करण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागत आहेत. सद्य:स्थितीला लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करून त्या माध्यमातून गरज भागविली जात आहे. संपूर्ण राज्यातच लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत चाकण, रायगड या भागातून लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध केला. सध्या चाकण येथेही ऑक्सिजनसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बेल्लारी येथून लिक्विड ऑक्सिजनचा एक टँकर मिळविण्यात आला.

जिल्ह्यात एक खाउगी प्रकल्पही उभारण्यात आला असून, या प्रकल्पातून २० के. एल. ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू दिला जात नसला तरी प्रशासनाला ऑक्सिजनसाठी दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आणखी एक प्रकल्प जिल्ह्याला मिळणार

परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्रकल्प मिळविण्यात यश आले असून, हा प्रकल्प येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. ५० हजार लिटर प्रति तास ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. याच धर्तीवर आणखी एक प्रकल्प जिल्ह्याला उपलब्ध होणार असून, तो जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यान्वित केला जाणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातही ऑक्सिजन यंत्रणा

कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ५० ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऑक्सिजन लाइन तयार करून ऑक्सिजन प्रकल्पही सुरू केला जाणार आहे. त्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतील, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ऑक्सिजन साठे

शासकीय रुग्णालयांमध्ये ५० केएल लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एक २० केएल क्षमतेचा प्रकल्पही खासगी तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे दररोज ७० केएल लिक्विड ऑक्सिजन साठवण्याची क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने क्षमतेएवढा ऑक्सिजन साठा प्राप्त होत नाही. याशिवाय १ हजार जम्बो सिलिंडर्स आणि २३ ड्युरो सिलिंडर प्रशासनाने खरेदी केले असून, या सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

रुग्णांना ऑक्‍सिजन कमी पडणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत आहे. मिळेल त्या मार्गाने ऑक्सिजन उपलब्ध केले जात असून, ऑक्सिजन साठवण्यासाठी उभारलेली टॅंक रिकामे राहणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे.

दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी

Web Title: Administration exercise for 15 tons of oxygen per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.