परभणी शहरात कारवाई: कृषी विभागाने केली औषधी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:01 IST2018-12-28T23:59:27+5:302018-12-29T00:01:02+5:30
शहरातील उघडा महादेव परिसरातील एका दुकानातून शेतीशी निगडित १० प्रकारची औषधी व एक प्रकारचा खत १५ डिसेंबर रोजी कृषी विभागाने कारवाई करत जप्त केला असून या औषधींचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविली आहेत.

परभणी शहरात कारवाई: कृषी विभागाने केली औषधी जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील उघडा महादेव परिसरातील एका दुकानातून शेतीशी निगडित १० प्रकारची औषधी व एक प्रकारचा खत १५ डिसेंबर रोजी कृषी विभागाने कारवाई करत जप्त केला असून या औषधींचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविली आहेत.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यासह परजिल्ह्यात बनावट कीटकनाशक औषधी व खते तयार करुन शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी विक्री केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीच्या खरीप हंगामाच्या तोंडावर परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात पोलीस प्रशासन व कृषी विभागाने बनावट औषधी व खते निर्माण करणाºया कारखान्यावर धाड टाकली होती. या कारखान्यातून २० प्रकारच्या औषधींचे नमुने पुणे व औरंगाबाद येथील प्रयोगाशाळेकडे पाठविण्यात आले होते. पाठविण्यात आलेले नमुने दोन्ही प्रयोगशाळेने बोगस असल्याचा अहवाल कृषी व पोलीस प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बोगस कंपन्यांकडून शेतकºयांची फसवणूक होत असल्याचेच समोर आले आहे.
कृषी विभागाने १५ डिसेंबर रोजी उघडा महादेव परिसरातील एका दुकानाची तपासणी केली. या तपासणीत कृषी क्षेत्राशी संबंधित १० प्रकारची औषधी व एका प्रकारचा खत आढळून आला. विशेष म्हणजे कृषी निविष्ठा विक्री करण्याचा कोणताही परवाना या दुकानदाराकडे आढळून आला नाही. कृषी विभागाने जप्त केलेली औषधी व खताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. कृषी विभागाने केलेल्या कारवाईच्या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, सामाले, जिल्हा कृषी विकास अधिकारी ममदे, नागोरे, पं.स.चे शिसोदे यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे ही कारवाई होऊन १५ दिवस उलटले आहेत. मात्र कृषी विभागाकडून या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आल्याने जिल्हाभरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.