सेलूत अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 15:29 IST2021-05-13T15:29:02+5:302021-05-13T15:29:55+5:30
एका कारमध्ये ( एमएच २२ यू ६५६४ ) दोघेजण अवैधरित्या दारूचे बॉक्स घेऊन मंठा रोडने सेलू शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सेलूत अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सेलू ( जि.परभणी ) : पाथरी व माजलगाव येथे अवैधरित्या दारू विक्रीसाठी घेऊन जाणारे दोघे आणि शहरात अवैध दारू विक्री करणारी एक महिला अशा तिघांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. त्यांच्याकडून दारू साठ्यासह एकूण चार लाख ९९ हजार ११० रूपयांचा मुद्देमाल सेलू पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका कारमध्ये ( एमएच २२ यू ६५६४ ) दोघेजण अवैधरित्या दारूचे बॉक्स घेऊन मंठा रोडने सेलू शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या तपासणीत रेल्वे गेटच्या अलीकडे तहसीलकडे जाणार्या रोडच्या कोपऱ्यावर माहिती मिळालेली कार आढळून आली. यावेळी कारमध्ये प्रमोद राधेश्याम पोरवाल (वय ४९,रा.शिक्षक कॉलनी पाथरी ) आणि विष्णू माणिकराव सोळंके (वय ३९, रा.गंगामसला ता.माजलगाव) हे दोघे होते. झडती घेतली असता कारमध्ये मॅकडॉल नंबर वन कंपनीचे दहा बॉक्स, विदेशी दारूचे ४८० बॉटल किंमत ७६ हजार ८०९ रुपये, तसेच इंपिरियल ब्लू कंपनीचे ४८ बॉटल किंमत ७२९० तसेच बडवायजर किंग ऑफ बीअर्स चे २४ बॉटल किंमत ४ हजार ६ ८० तसेच सिलव्हर रंगाची टाटा झेस्ट कार चार लाख रुपये असा एकूण चार लाख ८८ हजार सहाशे ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपी विरुद्ध गाडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटतीर्थवाले, पोलीस नाईक रामेश्वर मुंडे, विलास सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तसेच शहरात सायंकाळी सहा वाजता रेखाबाई भगवान काळे (वय ३५,रा.वालूर रोड, सेलू) या महिलेकडून विदेशी दारूच्या ३८ बॉटल किंमत सहा हजार ऐंशी रुपये तसेच इंपिरियल ब्लू कंपनीची २९ बॉटल किमत चार हजार ३५० रुपयाचा मुद्देमाल असा १० हजार ४३० मुद्देमाल जप्त केला. रामेश्वर मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ए.एस.आय सुधाकर चौरे आणि अनंता थोरवट तपास करित आहेत.