मोबाईल, आयपॅड चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात
By राजन मगरुळकर | Updated: July 29, 2023 18:33 IST2023-07-29T18:33:13+5:302023-07-29T18:33:20+5:30
स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणला गुन्हा

मोबाईल, आयपॅड चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात
परभणी : शहरातील पाथरी रोड भागात तीन दुचाकीस्वारांनी येऊन चाकूचा धाक दाखवून एकाच्या ताब्यातील मोबाईल व आयपॅड चोरून नेला होता. या आरोपीस परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने चोरीस गेलेल्या मुद्देमालासह गुरुवारी ताब्यात घेतले. या आरोपीच्या ताब्यातील दुचाकीही जप्त करण्यात आली.
पाथरी रोड भागात २६ जूनला फिर्यादी कामानिमित्त जात असताना रस्त्याच्या बाजूला थांबून फोनवर बोलताना तीन दुचाकीस्वारांनी येऊन चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या ताब्यातील आयपॅड व मोबाईल आणि अडीच हजार रुपये अशा ५७ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी नानलपेठ ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याला उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुस्हा शाखा व सायबर विभागाने तपास केला. स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी, अंमलदार व सायबर विभागाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुरुवारी घटनेतील आरोपी शेख आवेज शेख सलीम (१९, रा.आझाद कॉर्नर, परभणी) यास गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी व गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मोबाईल, आयपॅड असा ऐकून एक लाख १५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती, उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, साईनाथ पूयड, दिलावर खान, तूपसुंदर, हरिभाऊ खूपसे, दुधाटे, निलेश परसोडे, भदर्गे, सायबरचे बालाजी रेड्डी, गणेश कोटकर यांनी केली.