खळबळजनक! दिवसाढवळ्या घरात घुसून महिला डॉक्टरवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 15:23 IST2022-07-25T15:23:13+5:302022-07-25T15:23:41+5:30
घटनेनंतर पोलिसांनी काही संशयित्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

खळबळजनक! दिवसाढवळ्या घरात घुसून महिला डॉक्टरवर चाकू हल्ला
जिंतूर (परभणी) : घरी कोणी नसल्याचे बघून दोघांनी डॉ. ज्योती गणेश सांगळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची खळबळजनक घटना गणेश नगर भागामध्ये आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. डॉ. सांगळे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर अज्ञात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
शहरातील गणेश नगर भागामध्ये डॉ. गणेश सांगळे हे पत्नी डॉ. ज्योती आणि मुलगी श्रेयांशसह राहतात. आज दुपारी डॉ. ज्योती आणि मुलगी दोघेच घरी होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान डॉ. ज्योती घरकाम करत असतान अचानक दोघेजण घरात शिरले. जॅकेट व तोंडाला टोपी घातलेल्या दोघांपैक्की एकाने लहान मुलीला जवळ घेऊन चाकूचा धाक दाखला.
तसेच डॉ. ज्योती यांच्याही गळ्याला चाकू लावला. यावेळी आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी डॉ. ज्योती यांच्यावर चाकूने हल्ला करत पळ काढला. डॉ. ज्योती यांच्या बोटांना जबर दुखापत झाली आहे. दरम्यान, शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी काही संशयित्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, हल्ला कशामुळे झाला? कोणी केला? याची उत्तरे अद्याप मिळाले नसून पोलीस माहिती घेत आहेत. याप्रकरणी जिंतूर पोलिसात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.