Parabhani: महापालिका निवडणुकीपूर्वी वातावरणनिर्मिती करणाऱ्यांची कसोटी; चढाओढीचा किती फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:28 IST2025-12-19T19:27:38+5:302025-12-19T19:28:04+5:30
अनेकांनी पक्षांतर केले. अनेक कार्यक्रम घेतले. मात्र, ज्यासाठी हे केले त्या मतदारांना आपल्याच पक्षाला मत देण्यास प्रवृत्त करणे अवघड आहे.

Parabhani: महापालिका निवडणुकीपूर्वी वातावरणनिर्मिती करणाऱ्यांची कसोटी; चढाओढीचा किती फायदा?
परभणी : महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ज्यांनी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला, त्यांची आगामी काळात कसोटी लागणार आहे. कुणी पक्षीय कार्यक्रमांच्या माध्यमातून तर कुणी पक्षांतराच्या माध्यमातून ही चढाओढ करत होते. त्याची फलश्रुती काय? हे निकालातून दिसणार आहे.
परभणीत विधानसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील मनपाचे राजकीय वातावरण ढवळून काढले. अक्षय देशमुख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. मनपाच्या प्रश्नांवरही बैठक लावली. त्यानंतर भाजपने थेट मागच्या वेळी काँग्रेसला सत्तेचे गणित जुळवून देणाऱ्या माजी आ. सुरेश वरपूडकर यांनाच गळाला लावले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ मानला गेला. त्यानंतर महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी बोर्डीकर व वरपूडकरांच्या साथीने विविध कार्यक्रमांत गुंफून ठेवले.
या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस कशी मागे राहणार होती. माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशानंतर मुस्लिमबहुल भागात पुन्हा तोंड वर काढत आधीच पक्षात असलेल्या दिग्गजांनी साखरपेरणी सुरू केली होती. माजी खा. तुकाराम रेंगे, माजी आ. सुरेश देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांना हा नवा साथीदार मिळाला. तर नदीम इनामदार, भगवान वाघमारे या अनुभवी चेहऱ्यांना पाठबळ मिळाले.
उद्धवसेनाही विविध स्थानिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विधानसभेला लागलेली जोड कायम राहण्यासाठी काही ना काही प्रयत्न करताना दिसत होती. शिंदेसेना तर फक्त अंतर्गत बंडाळ्या दूर करण्यातच व्यस्त असल्याने वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या भेटीगाठी हाच त्यांचा सामान्यांशी जोडण्याचा एकमेव अजेंडा राहिला. इतर फारसे प्रयत्न दिसले नाहीत. त्यानंतर राष्ट्रवादीतही आ. राजेश विटेकरांच्या उपस्थितीत महानगराध्यक्ष प्रताप देशमुख व अक्षय देशमुख यांच्यातील कुरबुरी समोर येत होत्या. तर भाजपच्या शहरातील काही मंडळींनी ग्रामीण जिल्हाध्यक्षांशी पंगा घेत एकमेकांविरुद्ध तक्रारबाजी सुरू केली. या सर्व प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष फक्त जे पक्षात आहेत त्यांना थोपवून शांत दिसत आहे.
निधी आणण्यास वाव असल्यानेच मनपावर डोळा
मनपा क्षेत्रात विकास न झाल्याने मोठा निधी आणण्यासाठी वाव आहे. त्यामुळे पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाजपच्या सत्तेसाठी प्रयत्नशील आहेत तर आ. राजेश विटेकरांना राष्ट्रवादीची सत्ता अपेक्षित आहे. खा. संजय जाधव व आ. राहुल पाटील उद्धवसेनेच्या सत्तेसाठी प्रयत्नरत आहेत. दुसरीकडे काँग्रेसला पूर्वीप्रमाणे सत्ता राखण्यासाठी झगडावे लागत आहे. एवढेच काय तर गंगाखेडचे आ. रत्नाकर गुट्टे यांनीही परभणीत आघाडीचे पॅनल उभे करण्याचा चंग बांधला आहे.
मतांमध्ये परावर्तित कसे करणार?
अनेकांनी पक्षांतर केले. अनेक कार्यक्रम घेतले. मात्र, ज्यासाठी हे केले त्या मतदारांना आपल्याच पक्षाला मत देण्यास प्रवृत्त करणे अवघड आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक विकासपुरुषांची दमछाक झाली. शेवटी अर्थकारणाकडे सर्व बाबी झुकल्या. येथेही तेच आव्हान राहणार आहे. ज्यांची आर्थिक स्थिती बिकट त्यांची सत्तेची वाटही तेवढीच बिकट राहणार आहे.