नोकरीसाठी २० लाख दिले, तरी पूर्ण पगार नाही; त्रस्त प्राथमिक शिक्षकाने संपवले जीवन

By राजन मगरुळकर | Updated: April 17, 2025 17:30 IST2025-04-17T17:21:36+5:302025-04-17T17:30:03+5:30

सुसाईड नोटमध्ये संस्था सचिवांवर पगार बिल, अनुदानाबाबत गंभीर आरोप; परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात घडली घटना 

A stir in the education sector; A primary teacher ended his life by making serious allegations against the institute secretary. | नोकरीसाठी २० लाख दिले, तरी पूर्ण पगार नाही; त्रस्त प्राथमिक शिक्षकाने संपवले जीवन

नोकरीसाठी २० लाख दिले, तरी पूर्ण पगार नाही; त्रस्त प्राथमिक शिक्षकाने संपवले जीवन

परभणी : मानवत तालुक्यातील मंगरूळ बु. येथील नृसिंह प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकानेपरभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात गुरुवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, या शिक्षकाने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. समाज माध्यमावर ही सुसाईड नोट व्हायरल झाली असून यामध्ये संस्था सचिवांवर पगार बिल, अनुदानाबाबत गंभीर आरोप केले आहेत. 

सोपान उत्तमराव पालवे असे मयत शिक्षकाचे नाव आहे. पालवे हे सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील रहिवासी असून ते श्री नृसिंह शिक्षण प्रतिष्ठान संस्थेमध्ये मानवत तालुक्यातील मंगरूळ बु येथील शाळेत प्राथमिक शिक्षक पदावर चार वर्षांपासून कार्यरत होते. सदरील पदावर त्यांना घेण्यासाठी संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांनी त्यांच्याकडून वीस लाख रुपये घेतले व त्यानंतर या शाळेत चाळीस टक्के अनुदानित पदावर घेतो, असे सांगितले. संस्थेने पैसे घेऊनही त्यानंतर मार्च २०२४ च्या बिलानंतर पुढे बिल काढले नाही व ६० टक्के अनुदानावरून हे बिल २० टक्के अनुदानाने काढले. यात वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर तसेच टप्पा वाढीसाठी घेतलेले पैसे याबाबत विचारणा केली असता संस्था सचिवांनी धमकी दिल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येते. माझी फसवणूक करून मला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबाबत सोपान पालवे यांनी नमूद केले आहे. नृसिंह शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव बळवंत खळीकर यांच्याविरुद्ध हे आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहेत. 

या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत सोपान पालवे यांच्या पश्चात पत्नी सागर पालवे, मुलगी स्नेहल पालवे असा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारी दुपारी सुरू होते. याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी दिली

Web Title: A stir in the education sector; A primary teacher ended his life by making serious allegations against the institute secretary.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.