दुचाकीवरील किराणा दुकानदाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू
By ज्ञानेश्वर भाले | Updated: May 16, 2023 18:46 IST2023-05-16T18:46:09+5:302023-05-16T18:46:28+5:30
कुऱ्हाडी रस्त्यावरील भोसी शिवारात झाला अपघात

दुचाकीवरील किराणा दुकानदाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू
चारठाणा (जि.परभणी) : जिंतुर तालुक्यातील पिंपळगांव तांडा येथे गावाकडे मोटारसायकलवरून किराणा सामान घेऊन जात असताना, कुऱ्हाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
जिंतुर तालुक्यातील पिंपळगांव तांडा येथील पांडुरंग पवार (५५) यांचे गावात छोटे किराणा दुकान आहे. सोमवारी जिंतुर येथे किराणा दुकानाचे सामान घेऊन गावाकडे जात असताना, त्यांना कुऱ्हाडी रस्त्यावरील भोसी शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, पांडुरंग रूपला पवार हे जखमी अवस्थेत बेशुद्ध रस्त्यावर पडल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांना मिळाली. चेअरमन रोहिदास राठोड यांनी त्यांना सायंकाळी साडेसातच्या सुमारास उपचारासाठी जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकारी डाॅ.अंभुरे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
जिंतुर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास मयतावर पिंपळगांव काजळे तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मयत पांडुरंग पवार यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.