व्यापाऱ्याची १४.५० लाखांची बॅग लुटली; रात्री साडेआठच्या सुमारास गंगाखेड महामार्गावर थरार
By राजन मगरुळकर | Updated: March 5, 2025 23:44 IST2025-03-05T23:44:09+5:302025-03-05T23:44:46+5:30
गाडीतील १४.५० लाख रुपये ठेवलेली पिशवी धक्काबुक्की करून हिसकावल्याची घटना रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास घडली.

व्यापाऱ्याची १४.५० लाखांची बॅग लुटली; रात्री साडेआठच्या सुमारास गंगाखेड महामार्गावर थरार
राजन मंगरूळकर, परभणी : गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर उमरी फाटा जवळ बुधवारी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान एका चारचाकी वाहनातून परभणीकडे येणाऱ्या मिल व्यापाऱ्याच्या वाहनासमोर दुसरी चारचाकी लावून अडविले. त्यानंतर त्यांच्या गाडीतील १४.५० लाख रुपये ठेवलेली पिशवी धक्काबुक्की करून हिसकावल्याची घटना रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास घडली.
गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर उमरी फाटानजीक असलेल्या परिसरात जिनिंगचे मालक रामनिवास वर्मा हे त्यांच्या चारचाकी वाहनातून परभणीकडे येत होते. अन्य एका चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या चारचाकीसमोर चोरट्यांनी आपली चारचाकी लावली. तर वर्मा यांच्याशी धक्काबुक्की करून त्यांच्या कारमध्ये असलेल्या बॅग काढण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यास विरोध करीत असताना वर्मा यांना धक्काबुक्की केली. शेवटी ही बॅग हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. ही माहिती दैठणा पोलीस, पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. घटनास्थळी रात्री दहाच्या सुमारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, दैठणा ठाण्याचे सपोनि. अशोक जायभाये यांच्यासह अधिकारी दाखल झाले होते. त्यामध्ये रात्री पावणे अकराच्या सुमारास संबंधित व्यापाऱ्यांच्या रोकडबाबत चौकशी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
दरम्यान, या घटनास्थळी भेट दिली. परिस्थितीची पाहणी केली. यातील आरोपी लवकरच शोधून काढू, असा विश्वास पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केला.