८६ टक्के लाभार्थ्यांचे जिल्ह्यात आधार सिडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:50 IST2021-01-08T04:50:48+5:302021-01-08T04:50:48+5:30
परभणी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील ८६ टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडिंग पूर्ण झाले असून, ...

८६ टक्के लाभार्थ्यांचे जिल्ह्यात आधार सिडिंग
परभणी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील ८६ टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडिंग पूर्ण झाले असून, उर्वरित लाभार्थ्यांना ३१ जानेवारीपूर्वी आधार व मोबाइल सिडिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने मोहीम सुरू केली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेचे जिल्ह्यात सुमारे १४ लाख ९० हजार लाभार्थी आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार व मोबाइल सिडिंग करणे आवश्यक आहे, त्यासाठी स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस उपकरणामधील शपथपत्राद्वारे आधार सिडिंग व मोबाइल सिडिंग करता येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात मोहीम सुरू करण्यात आली आहे. जानेवारी २०२१ चे धान्य वाटप करताना ई-पाॅस उपकरणाद्वारे स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मार्फत कुटुंबातील सदस्यांचा आधार सिडिंग नसल्यास अशा सदस्यांचा आधार व मोबाइल क्रमांकाचे लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन सिडिंग करून घ्यावे लागणार आहे.
ई-केवायसी करण्याचे प्रशिक्षण स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आधार व मोबाइल सिडिंग करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी केले आहे.
तर मिळणार नाही धान्य
३१ जानेवारीपर्यंत आधार सिडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडिंग होईपर्यंत निलंबित केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांनी तीन महिन्यांत धान्य उचलले नाही. अशा सर्व शिधापत्रिका तपासणीअंती तात्पुरत्या निलंबित करण्यात येतील. त्यामुळे आधार क्रामांक व मोबाइल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करून ३१ जानेवारीपूर्वी आधार सिडिंग करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी केले आहे.