पोर्टेबिलिटीच्या सुविधेने ८ हजार लाभार्थ्यांनी उचलले धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST2021-04-20T04:17:40+5:302021-04-20T04:17:40+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभरात लॉकडाऊनची स्थिती आहे. या काळात ऊसतोड कामगारांसह कामाच्या शोधार्थ मोठ्या शहरात गेलेल्या कामगारांच्या अन्नधान्याचा प्रश्न निर्माण ...

पोर्टेबिलिटीच्या सुविधेने ८ हजार लाभार्थ्यांनी उचलले धान्य
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभरात लॉकडाऊनची स्थिती आहे. या काळात ऊसतोड कामगारांसह कामाच्या शोधार्थ मोठ्या शहरात गेलेल्या कामगारांच्या अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या कामगारांचे रेशन कार्ड एका जिल्ह्यात आणि ते वास्तव्याला इतर ठिकाणी असल्याने, या कामगारांनाही रेशनच्या धान्याचा लाभ व्हावा, यासाठी ‘वन नेशन व वन रेशन’ योजना सुरू करण्यात आली. त्याचा लाभ आता जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जात आहे.
परभणी जिल्ह्यात ‘वन नेशन वन रेशन’ या योजनेची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी दिली. या योजनेंतर्गत रेशन कार्ड लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीच्या साह्याने देशातील कोणत्याही राज्यात आणि राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून रेशनचे धान्य घेता येणार आहे. रेशन कार्ड लाभार्थ्यांना आधार क्रमांकच्या साह्याने कोणत्याही रेशन दुकानावर पोर्टेबिलिटी करून धान्य मिळविता येणार आहे. जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कामगार स्थलांतरित झालेले आहेत. ऊसतोड कामगार, तसेच कामाच्या निमित्ताने इतर जिल्ह्यात गेलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे. सध्या लॉकडाऊनची स्थिती असून, अशा काळात जिल्हा पुरवठा विभागाने वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे कोणत्याही रेशन धान्य दुकानावरून देशातील व राज्यातील कुठल्याही लाभार्थ्याला धान्य उपलब्ध होणार आहे.
लाभार्थ्यांनी काय करावे
लाभार्थ्यांनी रेशन कार्डावरील १२ अंकी क्रमांक इपॉस मशीनवर टाकून आधार क्रमांकाच्या साह्याने पोर्टीबिलिटी करून घ्यावी. त्यानंतर, संबंधित दुकानातून त्या लाभधारकास रेशनचे धान्य मिळणार आहे. लाभार्थ्यांना या संदर्भात काही अडचण आल्यास १४,४४५ हा हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
किती लाभार्थ्यांनी घेतला लाभ
तालुका लाभार्थी
गंगाखेड : ७४६
जिंतूर : १,१३१
मानवत : ४९४
पालम : २६७
परभणी : ३,४४६
पाथरी : २८१
पूर्णा : १७७
सेलू : १०६५
सोनपेठ : ४३६