महापालिकेतील ६७ कर्मचाऱ्यांना सेवेत केले कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:28 IST2021-05-05T04:28:31+5:302021-05-05T04:28:31+5:30
परभणी : येथील महानगरपालिकेत रोजंदारी कामगार म्हणून काम करणाऱ्या ६७ कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत कायम करण्यात आले असून, ४ मे ...

महापालिकेतील ६७ कर्मचाऱ्यांना सेवेत केले कायम
परभणी : येथील महानगरपालिकेत रोजंदारी कामगार म्हणून काम करणाऱ्या ६७ कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत कायम करण्यात आले असून, ४ मे रोजी या कर्मचाऱ्यांना उपमहापौर भगवान वाघमारे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
शासनाच्या नियमानुसार रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागील अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या संदर्भातील प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार मनपातील ६७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना ३ मे २०१९ पासून सेवेत कायम करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार ४,४४० ते ७,४०० या वेतन श्रेणीतील ग्रेड वेतन १,३०० रुपये याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करून सेवेत कायम करण्यात आले. कायम केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ६५ सफाई कामगार व २ वाहन चालकांचा समावेश आहे.
४ मे रोजी बी. रघुनाथ सभागृहात ६७ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, सभागृह नेते माजू लाला, माजी सभापती गुलमीर खान, भाजपच्या गटनेता मंगलताई मुदगलकर, शिवसेनेचे गटनेते चंद्रकांत शिंदे, उपायुक्त देविदास जाधव, अनंत कौशिकवार, रितेश जैन, कर्मचारी संघटनेचे नेते के.के. आंधळे, के.के. भारसाकळे, अनुसयाबाई जोगदंड, आनंद मोरे, मुजमुले आदींची उपस्थिती होती.
११ जणांना पदोन्नती
महापालिकेतील सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, बाळासाहेब देशमुख, मुजाहेद रहेमान खान, आवेज हाश्मी, मो. अ. मुक्तसिद खान, रिजवान शेख कमरोद्दीन, शशिकला गायके, जुबेर हाशमी, सय्यद समीर हाश्मी, मो. मिन्हाज अन्सारी, शफीक खान, बालाजी पिंपळगावकर या अकरा जणांना वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.